Saif Ali Khan Reveals Sucessful Marriage secrets : सैफ अली खान व करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबद्दल, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन आणि मुले यांच्याबद्दल बोलत असतात. अनेकदा एकमेकांच्या कामाबद्दलही कौतुक करत असतात. अशातच आता सैफ अली खाननं करीनाचं कौतुक केलं असून, त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे.

सैफ अली खाननं त्यांच्या संसाराचा गाडा करीनामुळे कसा सुरळीत सुरू आहे आणि दोघांची मतं, विचार सारखेच असल्यानं अडचणी निर्माण होत नाहीत, असं म्हटलं आहे. बहीण सोहा अली खानला दिलेल्या मुलाखतीत सैफनं लग्नानंतर करीनाबरोबर एक‌ अट‌‌ ठेवली होती, असं सांगितलं आहे. सैफ नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

वैवाहिक जीवनाबद्दल काय म्हणाला सैफ अली खान?

सैफ करीनाबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये मी कायम आनंदी, नशीबवान राहिलो आहे, असं काही नाहीये; पण मी आता आहे. त्यामागचं कारण म्हणजे माझा आणि माझ्या पत्नीचा समजूतदारपणा.” पुढे नात्यातील भावनिक गरजेबद्दल सैफ म्हणाला, “मलासुद्धा भावनिक आधाराची गरज असते; पण ते परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असतं. आपलं आपल्या पालकांबरोबर जसं नातं असतं, जसं आपण लहानाचे मोठे झालेले असतो. त्यामुळे आता आपला जोडीदार आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर यायला मदत करतो.”

सैफ पुढे, “स्वातंत्र्य जरी महत्त्वाचं असलं तरी एकमेकांबद्दल काळजी आणि ओढ असणंही महत्त्वाचं असतं. आपण आपल्या स्पेसमध्ये एकटे आनंदी असलो तरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीची ओढ, त्यांच्याबद्दल उत्सुकता असणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यामुळेच तर नात्याला अर्थ आहे,” असं म्हणाला. पुढे त्यानं मुलांच्या जन्मानंतरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. सैफ म्हणाला, “आमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्वतंत्र जागा आहे. मी काहीतरी करत असतो आणि ती तिचं काहीतरी करत असते. त्याचबरोबर आमच्यात बऱ्याच गोष्टी समान आहेत, ज्या आम्हाला पुन्हा एकत्र आणतात. मग आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलतो. त्यासोबतच आमच्यात खूप जवळीक, प्रेम व ऊब आहे आणि आम्ही ते आमच्या मुलांसोबतही शेअर करतो,”

सैफनं पुढे सांगितलं की, एकनिष्ठेनं नातं टिकवून ठेवण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. “जेव्हा गोष्टी सुरळीत पार पडत नाही तेव्हा आम्ही त्यावर काम करतो, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो”.

लग्नानंतर ठेवलेली ऑनस्क्रीन किस न करण्याची अट

नात्यामधील असुरक्षिततेबद्दल बोलताना सैफनं सांगितलं की, ही असुरक्षितता अजून वाढते जेव्हा तुम्ही दोघे कलाकार असता. पुढे सैफनं त्यानं व करीनानं एकमेकांपुढे एक अट ठेवलेली याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “ऑनस्क्रीन कोणत्याच सहकलाकाराला किस करायचं नाही, असा निर्णय घेतला होता; पण तो योग्य मार्ग नाही.”