Saif Ali khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना त्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्या व्यक्तीने सैफच्या घरी काम करणाऱ्या गृहसेविकेसह वाद घातला. त्यानंतर सैफ अली खान मधे पडला. सैफवर या अज्ञात इसमाने वार केले. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या आहेत. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या घटनेबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदींनी वांद्र्यातल्या लोकांनाच का टार्गेट केलं जातं? असा सवाल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे येथील लोकांनाच का टार्गेट केलं जातं?-प्रियांका चतुर्वेदी

“अभिनेता सैफ अली खानवर झालेला चाकू हल्ला अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार आहे. या घटनेमुळं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते. सलमान खानला आज बुलेट प्रुफ घरात राहावं लागतं आहे. बाबा सिद्दिकींचा रस्त्यावर खून झाला, लॉरेन्स बिश्नोई गँगला ब्लेम केलं जातं, बिल्डर लॉबीला काही म्हटलं जात नाही हे झिशान सिद्दीकीनं म्हणणं आहे. आता आज सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. तिन्ही घटना मुंबईतल्या वांद्रेमध्ये झाल्या आहेत, तिन्ही घटना नामांकित व्यक्तींबाबत झाल्या आहेत. हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे. ९० च्या दशकात दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असे तसाच प्रयत्न आता आहे”, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी?

वांद्रेसारख्या भागात सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात,तिथं कायदा व सुव्यवस्था इतर भागांपेक्षा चांगली आहे. मात्र, तिथेच या घटना घडत आहेत. यावरुन मुंबईत काय संदेश जातो ? बाबा सिद्दिकीच्या कुटुंबाला न्याय मिळाला, तर नाही मिळाली. सलमान खानला खुलेपणानं जीवन जगता येत नाही. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला आपल्याकडे सोपवण्याची मागणी गुजरात पोलिसांकडे केली नाही, आता तरी गृहमंत्र्यांनी जागरुक व्हावं, राजकारण कमी करुन त्यांच्या कामात लक्ष द्यावं. ज्या प्रकारे घटना घडत आहेत त्यातून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होतील. कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करा.मुंबई पोलिस आयुक्तांकडून जबाबदारी निश्चित करुन घ्या, असं प्रियांका चतुर्वेदींनी म्हटलंय. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे विधान केलं आहे.

नेमकं काय घडलं? काय माहिती समोर आली?

सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात चोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे पोलीस याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत.

मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया

रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan knife attack shivsena ubt leader priyanka chaturvedi said why all incidents happened in bandra scj