दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचया ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्या दिवसापासून हा चित्रपट चर्चेत आहे. टीझर पाहिल्यानंतर यातील व्हीएफएक्स आणि रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानचा लुक याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीकाही होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर राग व्यक्त केला आहे. पण याबरोबरच ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘महाभारत’ मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारलेले अभिनेता पुनीत इस्सर यांनी यावर राग व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुनीत इस्सर यांनी रावण महाज्ञानी असल्याचं म्हणत जर रावणाच्या कपाळावर टिळा नसेल तर तो रावण नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांनी ‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप घेत ज्याच्याशी लोकांची आस्था जोडली गेली आहे त्या भूमिका साकारताना तुम्ही गरजेपेक्षा जास्त लिबर्टी घेऊ शकत नाही असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो “मी ‘महाभारत’ही करेन पण…”

‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेला होत असलेल्या विरोधाला पुनीत इस्सर यांनी समर्थन दिलं आहे. ते म्हणाले, “क्रिएटीव्ह लिबर्टीच्या नावाखाली कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक इतिहासाचं खंडन करू शकत नाही. रावणाला ४ वेद आणि ६ शास्त्रांचं ज्ञान होतं. त्याच्यापेक्षा मोठा शिवभक्त कुणीही नव्हता. त्याला शिवाचं वरदान होतं. मग जर रावणाच्या कपाळावर टिळा नसेल तर तो रावण होऊ शकतच नाही.”

पुनीत इस्सर यांनी याच मुलाखतीत चित्रपटाच्या निर्मात्याने संतप्त सवाल केला आहे. ते म्हणाले, “लिबर्टीच्या नावाखाली तुम्ही सीख गुरूंना मिशा नसलेले दाखवू शकता का? मग रावणाबरोबर असं का केलं? तो पूर्णपणे अलाउद्दीन खिल्जी किंवा तैमूर यांच्यासारखा दिसतोय. त्यामुळे लोकांचा यावर संताप स्वाभाविक आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची निर्मिती करताना याची काळजी घ्यायला हवी.”

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

पुनीत इस्सर पुढे म्हणाले, “टीझरमध्ये तुम्ही प्रभू रामाला पिळदार मिशा असलेल्या दाखवत आहात. पण रावणाचे केस कापलेले आहेत. त्याला स्पाइक्स लूक दिला आहे. ज्यामुळे तो पूर्णपणे तालिबानी असल्यासारखा दिसत आहे. तुम्ही रावणाला तालिबानी का ठरवत आहात?”

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स, हनुमान आणि रावण यांचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. खास करून सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan ravana look in adipurush mahabharat fame punit issar angry reaction on it mrj
First published on: 06-10-2022 at 10:45 IST