Saif Ali Khan Fitness and Diet Secrets: ‘दिल चाहता है’, ‘ओमकारा’ आणि ‘तानाजी’सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता सैफ अली खान वयाच्या ५६ व्या वर्षीही कमालीचा फिट आणि हँडसम दिसतो. अनेक सेलिब्रिटी कडक फिटनेस रुटीन पाळत असताना सैफ मात्र अगदी साध्या आणि घरगुती आहारावर विश्वास ठेवतो. सैफने आपल्या डाएट रुटीनबद्दल खुलासा करत सांगितलं की, फिट राहण्यासाठी महागडे अन्न किंवा कडक पथ्याची गरज नसते. दुपारच्या वेळी भाजी, डाळ, पोळी असा हलका शाकाहारी आहार आणि रात्री मांसाहार करणे त्याला आवडते.
सैफने ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या डाएटबद्दल सांगितलं. सैफला रात्री मांसाहार करायला आवडतो, पण दिवसा तो हलका शाकाहारी आहार घेतो. “मला दुपारचं जेवण थोडं हेल्दी आवडतं. रात्रीच्या जेवणात मी अनेकदा मटण/चिकन खातो, पण दुपारचं जेवण शाकाहारी असतं. नाश्त्याला अंडी आणि टोस्ट, तर दुपारी सहसा भाजी, भेंडी, डाळ, गाजर-मटारची भाजी आणि एक पोळी असा अगदी साधा आहार घेतो. कधीकधी मी मासे आणि भातसुद्धा खातो,” असं सैफ अली खान म्हणाला.
सेटवरचं जेवण टाळतो सैफ अली खान
सैफ शूटिंगदरम्यान फिटनेस रुटीन पाळण्यासाठी अनेकदा स्वतःच्या शेफची मदत घेतो. सेटवर मिळणारे जेवण नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असतं असं नाही, म्हणूनच मी घरातून डबा नेतो, असं त्याने सांगितलं होतं. सैफ म्हणाला, “तुम्हाला फिट राहायचं असेल तर फिल्म युनिटचं जेवण टाळलं पाहिजे. त्यामुळे शूटिंगदरम्यान मी सहसा घरातूनच जेवण आणतो. पण जर आम्ही सुट्टीवर असू किंवा परदेशात शूटिंग करत असू, तर तिथे डाएटयोग्य भारतीय जेवण असेलच असं नाही.”
तेलकट व मसालेदार खात नाही सैफ अली खान
सैफला खाण्याची फार आवड आहे, पण तरीही तो जास्त तेलकट किंवा पचायला जड पदार्थ वारंवार खात नाही. त्याच्यासाठी जेवणाच्या चवीपेक्षा पोषण जास्त महत्त्वाचं आहे. सैफ म्हणाला, “मला जास्त मसालेदार किंवा पचायला जड जेवण आवडत नाही, संध्याकाळी फार फार तर कबाब खातो. पण ऐरवी माझा आहार डाएटला साजेसाच असतो, कारण डाएट माझ्या कामावर अवलंबून असतो. काही लोक फक्त खाण्यासाठीच जगतात.”
“मी शरीराला गरज आहे म्हणून खातो. अन्नाच्या चवीपेक्षा माझ्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी आणि माझी पत्नी पतौडीमध्ये असतानाही अगदी साधेच जेवण जेवतो,” असं सैफ अली खानने सांगितलं.
