बॉलीवूडची सर्वात लाडकी जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या लग्नाला १६ ऑक्टोबर रोजी १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या लग्नाचा वाढदिवस या जोडीने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या मंचावर अत्यंत खास शैलीत साजरा केला. या शोममध्ये सैफने रात्री त्यांच्या बेडरूमचा वास कसा येतो, याबद्दल मजेशीर खुलासा केला.
नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केलेल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये, कपिल शर्मा सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना ते काय खातात? असा प्रश्न विचारतो. कारण ते नेहमीच खूप फ्रेश दिसतात व त्यांची त्वचा तजेलदार आहे. त्यावर सैफ म्हणाला, “आजकाल आमच्याकडे खूप तूप येतंय.” त्यावर करीना मध्येच म्हणते, “गोवर्धन तूप.” माहितीसाठी, सैफ यापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (KBC) गेला होता आणि तिथे तो गेम जिंकला, ज्याचं बक्षीस म्हणून त्याला दोन वर्षांसाठी मोफत तूप मिळतंय.
आमच्या बेडरूमचा वास ढाब्यासारखा येतो – सैफ अली खान
करीना पुढे म्हणाली, “आम्ही आमच्या घरात खूप तूप खातो.” यावर आश्चर्यचकित होऊन कपिल शर्माने विचारलं, “खरंच, तुम्ही तूप खाता का?” त्यावर करीना म्हणाली, “होय. आमची मुलं खातात, आम्हीही खातो.” सैफ अली खानने बोलण्याची परवानगी मागितली आणि करीना तुपाचा कसा वापर करते याचा खुलासा केला. तो म्हणाला, “ती फक्त तूप खातच नाही, तर दररोज रात्री ते तिच्या पायांनाही चोळते.” दुजोरा देत करीना म्हणाली, “त्यामुळे शांत झोप लागते.” मग सैफने गमतीने म्हणाला, “विचार करा, ही किती रोमँटिक गोष्ट आहे की दररोज रात्री एखाद्या आमच्या बेडरूमचा वास ढाब्यासारखा येतो.” हे ऐकून स्टुडिओमधील सगळेच खळखळून हसू लागले.
दरम्यान, करीनाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर सैफबरोबरचे काही सुंदर व अनसीन फोटो पोस्ट केले. या फोटोंवर मलायका अरोरा, अमृता अरोरा, शिबानी दांडेकर अख्तर, रिद्धिमा कपूर साहनी, सोहा अली खान, सबा अली खानसह अनेकांनी कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या.
सैफ अली खान व करीना कपूर खान १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना तैमूर व जेह ही दोन मुलं आहेत. सैफची पहिली पत्नी अमृता सिंह हिच्यापासून त्याला सारा अली खान (वय ३१) आणि इब्राहिम अली खान (वय २५) ही दोन अपत्ये आहेत.
