Saif Ali Khan sister Saba Ali Khan Unmarried Reason : अभिनेता सैफ अली खानची बहीण सोहा अली खान आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कारण सोहादेखील उत्तम अभिनेत्री असून तिने बऱ्याच बॉलीवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्याची बहीण सबा अली खानबद्दल फारशा लोकांना माहिती नाही. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांना तीन अपत्ये. सैफ, सबा व सोहा. सबा ही फिल्मी दुनियेपासून दूर आहे. ती ज्वेलरी डिझायनर आहे आणि लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. ५० वर्षांची सबा अली खान अविवाहित आहे. अभिनेत्री नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांच्याशी बोलताना सबाने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं.
सबा अली खान म्हणाली, “माझा कोणताही बॉयफ्रेंड नव्हता. मी १८-१९ वर्षांची असतानाच लग्नासाठी बऱ्याच लोकांना भेटले होते, पण मी कोणाशीच लग्न केलं नाही. १९ व्या वर्षी कोलकाता येथील एका मुलाशी माझं लग्न जवळजवळ ठरणारच होतं. आमची एकमेकांशी माझी ओळख करून देण्यात आली होती. पण ते लग्न काही ठरलं नाही, कारण मी त्या वेळी खरोखरच लग्नासाठी तयार नव्हते.”
मनासारखा जोडीदार मिळाला नाही – सबा अली खान
सबाने सांगितलं की नंतरच्या काळात ती लग्नासाठी तयार होती, पण तिला आवडेल असा जोडीदार मिळाला नाही. “मला कम्पॅटिबल असा कोणताही जोडीदार मिळाला नाही. आणि अब्बांसारखे वडील असल्यानंतर…खरं तर माझे वडील एक उत्तम व्यक्ती होते. त्याचा अर्थ अगदी त्यांच्यासारखाच मुलगा मला हवा होता असं नाही, कारण वडील हे शेवटी वडीलच असतात,” असं सबा अली खान म्हणाली.
सबा अली खानला कसा जोडीदार हवा होता?
आपल्या भावी जोडीदाराकडून काय अपेक्षा होत्या? त्याबद्दल सबा म्हणाली, “मला करिश्माई, नम्र आणि जबाबदार जोडीदार हवा होता. तापसी पन्नूने एकदा म्हटलं होतं की, ‘मला मुलगा नकोय, एक प्रौढ-समंजस पुरुष हवा आहे.’ तिचं हे वाक्य मला खूप पटले होते. पण दुर्दैवाने मला तशी व्यक्ती मिळालीच नाही.”
दरम्यान, सैफ अली खानच्या घरी प्रत्येक कार्यक्रमाला व सणाला सबा उपस्थित असते. सबाचं सैफ व अमृता सिंहची मुलं सारा अली खान व इब्राहिम अली खान यांच्याशीही चांगलं नातं आहे. ती कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो पोस्ट करत असते. त्याचबरोबर सबाचं वहिनी करीना कपूरशीही खास बाँडिंग आहे.
