Saif Ali Khan Pataudi Palace : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान हा पतौडी या रॉयल फॅमिलीतून येतो. या कुटुंबाचा हरियाणामध्ये पॅलेस असून सध्या या राजवाड्याची मालकी सैफकडे आहे. अनेकदा तो कुटुंबासह या रॉयल पॅलेसमध्ये सुट्टीसाठी जात असतो. या आलिशान पॅलेसमध्ये सुमारे १५० खोल्या, मोठी बाग, भव्य अंगण आहे. यामध्ये राजेशाही वास्तुकलांचा आकर्षक नमुना पाहायला मिळतो. सैफ अली खान या १२०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, या पॅलेसमधील काही जागा ही सोहा अली खान हिच्याही मालकीची आहे.
अभिनेत्री सोहा अली खान ही अनेकदा त्यांच्या कुटुंबाच्या आठवणी आणि किस्से शेअर करत असते. पतौडी पॅलेसबाबत सोहा अली खानने अनेकदा रंजक खुलासे केले आहेत. शाही निवासस्थानाबद्दल त्यांच्या कुटुंबाचा काय भावना आहेत, तसेच देखभालीचा खर्च कसा करतात, याबद्दल तिने माहिती दिली आहे. ‘झूम’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोहा अली खान हिने राजवाड्यातील एकेकाळी जनरेटर रूम असलेली खोली तिच्या वाट्याला आल्याचे सांगितले आहे.
सोहा म्हणाली, “काही वर्षांसाठी पतौडी पॅलेस हा एका हॉटेल व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला होता; तेव्हा आई-वडिलांना राहण्यासाठी स्वतंत्र जागेची गरज होती, त्यामुळे जनरेटर रूमचे रूपांतर सुंदर आणि प्रशस्त घरामध्ये करण्यात आले. आता पतौडी पॅलेसमधील ही २ बीएचके जागा माझ्या मालकीची आहे.”
पतौडी पॅलेस भाडेतत्त्वावर दिलेला असताना सोहाच्या आई-वडिलांना राहण्यासाठी जनरेटर रूमचे २ बीएचके घरात रूपांतर करण्यात आले होते. सध्या पतौडी पॅलेसचा मुख्य भाग भाऊ सैफ अली खान यांच्या मालकीचा असला, तरी जनरेटर रूमपासून तयार करण्यात आलेल्या या घराची देखभाल आणि देखरेखीची जबाबदारी स्वतः सोहा अली खान सांभाळत असल्याचे तिने स्पष्ट केले.
कुटुंबाने कधीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही, असं सोहाने सांगितलं. ती म्हणाली, “आयुष्यात मला ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्या सर्व मी केल्या. मी काय करावे आणि काय नाही, याविषयी माझ्या कुटुंबीयांनी त्यांची मते माझ्यावर लादली नाहीत. घरातील मुलींआधी मुले जेवतील, अशा अपेक्षा घरांच्यानी कधीच केल्या नाहीत.”
सोहा अली खानचे चित्रपट
दरम्यान, सोहा अली खानने बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘दिल मांगे मोर’, ‘शादी नंबर १’, ‘खोया खोया चांद’, ‘दिल कब्बडी’, ‘९९’ अशा चित्रपटांत काम केले आहे. आता सोहा अली खान हिचा युट्युब चॅनल असून यामधून ती सिनेविश्वातील विविध कलाकारांच्या मुलाखती घेत असते.
