सैफ अली खान लवकरच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटात दृष्टिहीन मार्शल आर्ट्सपटू आणि संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे. क्रीडा आणि संगीत हे दोन्ही विषय सैफच्या जवळचे असल्याने, त्याने वडील आणि माजी क्रिकेटपटू टायगर पतौडी यांच्या आयुष्यावर अद्याप चित्रपट का बनवला नाही, याबद्दलही भाष्य केलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार’ वडिलांवर अद्याप चरित्रपट का बनवला नाही, याबद्दल बोलताना सैफ म्हणाला, “काही विषय तुमच्या मनाच्या खूप जवळचे असतात. त्यामुळे त्यावर चित्रपट बनवताना तो योग्य पद्धतीनेच साकारला जावा, याची तुम्हाला खात्री करायची असते. एखादा साधारण चित्रपट बनवून त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना खराब व्हाव्यात, असं मला वाटत नाही. त्यांनी एका शारीरिक अडचणीवर मात करून मिळवलेलं यश ही खूप मोठी गोष्ट आहे. हा चित्रपट बनवणं म्हणजे जणू ब्रूस ली यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासारखं आहे.”

त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी खूप वयस्कर झालो आहे – सैफ अली खान

पुढे सैफने क्रिडा विषयांवर आधारित चित्रपटांबद्दलही आपलं मत मांडलं. तो म्हणाला, “क्रिडा चित्रपटांबाबत माझी अडचण अशी आहे की, कलाकारांच्या माध्यमातून खेळाडूंची देहबोली तुम्ही पडद्यावर कशी उतरवणार? किंवा एखाद्या खऱ्या खेळाडूला अभिनय कसा शिकवणार? अँडी रॉबर्ट्स यांच्यासारखी आक्रमक आणि वेगवान रनअप एखाद्या अभिनेत्याला कशी करता येईल? शिवाय, आता त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी कदाचित खूप वयस्कर झालो आहे. कदाचित त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील भूमिका मी साकारू शकेन. मात्र, ती भूमिका कशी साकारायची हे मला नक्कीच माहीत आहे.”

वडिलांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला तर त्याचं दिग्दर्शन तो स्वतः करणार का, असा प्रश्न सैफला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला वाटतं, दिग्दर्शन ही खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक पात्राचा विचार त्याच्या दृष्टिकोनातून करणं मला जमेल की नाही, याची मला खात्री नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा मी एखाद्याला साधारण काम करताना पाहतो, तेव्हा मला वाटतं की मी हे करू शकतो, पण जेव्हा एखादा उत्तम दिग्दर्शक पाहतो, तेव्हा मला तसं वाटत नाही. पण मला असं वाटतंय की एकदा तरी मला चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव घ्यायला आवडेल, जरी ते करताना माझं अक्षरशः डोकं फिरण्याची शक्यता असली तरी.”

दरम्यान, अक्षय कुमार व सैफ अली कान यांचा ‘हैवान’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट येत्या ११ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.