Saif Ali Khan was advised by senior actor to hide marriage with Amrita Singh: सैफ अली खानने जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पणही केले नव्हते, त्याआधीच त्याने अमृता सिंगबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता. अमृता त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तर सैफ अली खानने नुकतीच त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
बेखुदी हा त्याचा पदार्पणाचा सिनेमा मानला जात होता. या सिनेमासाठी त्याने शूटिंग केले होते. मात्र, अर्धे शूटिंग झाल्यानंतर तो सिनेमातून बाहेर पडला होता. या कठीण काळात, एका ज्येष्ठ अभिनेत्याने सैफ अली खानला अमृताबरोबरचे लग्न लोकांपासून लपवून ठेवण्याचा सल्ला दिला होता.
“तो आतापर्यंतचा सर्वात वाईट…”
सैफ अली खानने नुकताच न्यूज १८ बरोबर संवाद साधला. तो म्हणाला, “एका ज्येष्ठ अभिनेत्याने मला सांगितलं होतं की, विवाहित असल्याचं कोणालाही सांगू नकोस. मला माहित नाही, त्यांनी मला तसं का सांगितलं. मला वाटतं की त्यांनी विचार केला असेल की जर मी विवाहित असल्याचं सांगितलं तर माझी प्रतिमा खराब होईल. तसेच माझा चाहतावर्गही कमी होईल. पण, तो आतापर्यंतचा सर्वात वाईट आणि विचित्र सल्ला होता.”
बेखुदी सिनेमातून अभिनेता बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकला नाही. १९९३ ला यश चोप्रांच्या ‘परंपरा’ या सिनेमातून त्याने पदार्पण केले. सैफ व अमृता सिंग यांची भेट ‘बेखुदी’च्या सेटवर झाली होती. जरी सैफला चित्रपटातून बाहेर काढले असले तरी सैफ व अमृताला एकमेकांच्या संपर्कात होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्यात १२ वर्षांचे अंतर होते. १९९१ मध्ये त्यांनी लग्न केले. सैफ अली खान २१ वर्षांचा होता. त्यावेळी अमृता सिंगचे वय ३३ वर्षे होते. त्यांना दोन मुले आहेत. लग्नाच्या १३ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.त्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी २०१२मध्ये लग्न केले. त्यांना जेह व तैमुर ही दोन मुले आहेत.
याबरोबरच, जरी सैफ अली खानने अभिनेत्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तरी, अनेक कलाकारांनी त्यांचे लग्न झाल्याचे लपवून ठेवले होते. यामध्ये गोविंदाचे नावही घेतले जाते.
झुमला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, लग्नानंतर मी बाहेर जात नसे. कारण जर आमच्या लग्नाबद्दल लोकांना समजले तर त्याचा महिला चाहतावर्ग कमी होईल, असे मला सांगितले होते. पण, जेव्हा मी गरोदर होते, त्यावेळी जगापासून लग्न लपवल्याबद्दल, माझी ओळख न सांगितल्याबद्दल गोविंदाला मी प्रश्न विचारले होते. जेव्हा टीनाचा जन्म झाला, तेव्हा आम्ही आमच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या एक वर्षानंतर आम्ही त्याबद्दल सांगितले.
दरम्यान, सैफ अली खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंगने कधीही लग्न केले नाही.
