Mohit Suri on Faheem Abdullah: काही दिवसांपूर्वीच चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक, कलाकार, गायक यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मध्ये फहीम अब्दुल्ला यांना ‘सैयारा’च्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. मात्र, फहीम या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे ‘सैयारा’चे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आणि त्याच्या संघर्षमय प्रवासाबद्दलही सांगितले.
मोहित सुरी काय म्हणाले?
पुरस्कार सोहळ्यात बोलताना मोहित सुरी म्हणाले की, गायक बनण्याची इच्छा असूनही फहीमने शिक्षण आणि परीक्षा देणे कधीच सोडले नाही, कारण संगीत क्षेत्रात यश मिळेल की नाही याबाबत तो साशंक होता. मोहित म्हणाले, “मी फहीमला भेटलो तेव्हा तो सतत परीक्षा देत होता. मी त्याला विचारायचो की तू या परीक्षा का देतो आहेस? तेव्हा तो मला म्हणायचा की, माझ्या करिअरचं काय होईल माहीत नाही आणि मी यशस्वी होईन की नाही हेही माहीत नाही. या चित्रपटाआधी तो आणि अर्सलान निजामी अतुल सेतूबरोबर काम करत होते.” पुढे ते फहीमला उद्देशून म्हणाले, “आता हा पुरस्कार जिंकल्यानंतर हे सिद्ध झालं आहे की तुला नोकरीची गरज नाही, तू यशस्वी होणारच आहेस.”
माहितीसाठी सांगायचे तर ‘सैयारा’च्या टायटल ट्रॅकचा सह-संगीतकार असलेला अर्सलान निजामी हा सिव्हिल इंजिनिअर असून त्याने संगीतासाठी नोकरी सोडली; तर श्रीनगर, काश्मीरमधील फहीम अब्दुल्ला हा बहुआयामी कलाकार आहे. अर्सलानने तनिष्क बागची यांच्यासोबत हे गाणं कंपोझ केलं, तर फहीमने आपल्या आवाजाने ते गाणं लोकप्रिय केलं.
या श्रेणीत फहीमने अनेक प्रसिद्ध गायकांना मागे टाकत पुरस्कार पटकावला. इतर नामांकनांमध्ये हनुमानकाइंड (Hanumankind), सुधीर यादववंशी, शाश्वत सचदेव आणि मोहम्मद सादिक यांचा धुरंधरच्या टायटल ट्रॅकसाठी समावेश होता. तसेच अरिजीत सिंग, शाश्वत सचदेव आणि अरमान खान यांना ‘धुरंधर’च्या ‘गेहरा हुआ’ गाण्यासाठी नामांकन मिळाले होते. याबरोबरच, अरिजीत सिंगला ‘सैयारा’च्या ‘धुन’साठी जुबिन नौटियालला ‘बरबाद’ गाण्यासाठी नामांकन मिळाले होते.
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन आलिया भट्ट, स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान, अभिनेता सुनील ग्रोव्हर आणि पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी केले.
