Saiyami Kher Bollywood Experience : सिनेविश्वामध्ये अभिनेत्री सैयामी खेरने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी, दाक्षिणात्य सिनेमांपासून ते बॉलीवूडमध्ये तिने प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळ्या सैयामीचे निखळ सौंदर्य आणि अभिनयामुळे तिचे वेगळेपण दिसून येते. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये सैयामीला तिच्या लूकवरून आणि कपड्यांवरून बोलण्यात आले होते.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैयामी खेरने तिचे सिनेविश्वातील अनुभव शेअर केले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये तिला खूप लोकांनी तिचा लूक बदलण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ काम करायचं असेल तर लूक आणि कपड्यांची स्टाइल बदलण्याचा सल्ला देण्यात आला होता. सैयामीला तिचे नैसर्गिक कुरळे केससुद्धा बदलण्यास सांगितले होते.
सैयामी खेरला करिअरच्या सुरुवातीला काय दिला होता सल्ला?
सैयामी म्हणाली, “जेव्हा मी नवीन होते आणि नुकतीच कामाला सुरुवात केली होती, तेव्हा मला माझ्यामध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. अनेक मॅनेजर्सनी मला विशिष्ट पद्धतीचे कपडे घालण्यास सांगितलं होतं. सिनेविश्वातील अभिनेत्री जशा दिसतात, तसं दिसण्यासाठी मला माझ्यामध्ये बदल करण्यास सांगितलं होतं. अभिनेत्री कशी असावी याच्या ठराविक साच्यात मी बसले पाहिजे, असे मला सांगितले जायचे. पण, मी त्यांचं कधीच ऐकलं नाही. तरीही मी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत, ज्यांचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलंय.”
कुरळे केस ठेवू नकोस – सैयामी
पुढे ती म्हणाली, “मला कपड्यांची स्टाइल बदलण्याचा सल्ला दिला जायचा. मला ‘नाही, नाही, कुरळे केस ठेवू नकोस’ असंही सांगितलं जायचं. पण, माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये असे बदल करण्याचा सल्ला देणाऱ्यांचं मी कधीच ऐकलं नाही आणि याबद्दल खूप चांगलं वाटतं. कारण मी माझ्या मनाचं ऐकलं आणि स्वतःशी प्रामाणिक राहिले. मला मैदानी खेळाची आवड असून मला माझे राजकीय विचार मांडायला आवडतात, मी स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला आणि याबद्दल मला आनंदच आहे.”
इंडस्ट्रीच्या अपेक्षांनुसार स्वतःमध्ये बदल केला नाही तरी खूप चांगली कामं मिळतात, ही गोष्ट हळूहळू लक्षात आल्याचं सैयामी खेरने सांगितलं आहे. ती म्हणाली, “लोक तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमचं मूळ व्यक्तिमत्त्व जपलं पाहिजे, कारण तेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं; नाहीतर तुम्ही एखाद्या कारखान्यातून तयार झालेल्या एकसारख्या असणाऱ्या बार्बी डॉल होऊन जाल आणि मला ते व्हायचं नव्हतं. माझ्या आई-वडिलांनी मला मूल्यांसह संस्कार दिले होते आणि मी तेच व्यक्तिमत्त्व ठेवून काम करत राहिले.”
सैयामीचा ‘हैवान’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
दरम्यान, सैयामी खेरने अनेक सिनेमांमध्ये तिचे वेगळेपण दाखवून दिले आहे. ‘घूमर’ या चित्रपटातील तिची विशेष भूमिका गाजली होती. यामध्ये तिने अभिषेक बच्चन आणि अंगद बेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. तसेच तिने ‘शर्माजी की बेटी’, ‘अग्नी’ आणि ‘वाइल्ड डॉग’ या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर २०१८ मध्ये आलेल्या रितेश देशमुख यांच्या ‘माऊली’ सिनेमामध्येही सैयामी खेरने काम केले होते. लवकरच तिचा ‘हैवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
