Salim Khan Health Update: बॉलीवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा एक चित्रपट देण्यात ज्या लेखकद्वयीचे महत्त्वपू्र्ण योगदान आहे, ती म्हणजे सलीम-जावेद ही जोडी. सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी बॉलीवूडला ‘अँग्री यंग मॅन’ मिळवून दिला. शोले, दीवार, जंजीर, डॉन यांसारख्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या.

सलीम खान हे काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल केले गेले असून, नऊ दिवसांनंतरही त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही. ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सलीम खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. १८ फेब्रुवारीला ‘हेल्थ बुलेटिन’ जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, नऊ दिवसांपासून सलीम खान यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच इंडस्ट्रीमधील मित्र परिवार त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सलीम खान यांना नऊ दिवसांनंतरही मिळाला नाही डिस्चार्ज

डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलीम खान यांचे वय जास्त असल्याने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती ‘हेल्थ बुलेटिन’मध्ये दिली होती. त्यानंतर दोन दिवसांत व्हेटिंलेटर हटवले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गेल्या शुक्रवारी अभिनेते एजाज खान यांनी रुग्णालयात सलीम खान यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते अजूनही आयसीयूमध्ये आहेत; परंतु त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडल्या, तर देवाच्या कृपेने सोमवारी सलीम खान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी परत येतील, असे ते म्हणाले होते. मात्र, सलीम खान यांना अजूनही डिस्चार्ज मिळाला नाही.

डेझी शाहने नुकतीच ‘फिल्मीज्ञान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली की सलीम खान किंवा त्यांच्या कुटुंबियांना दवाखान्यात जाऊन भेटू शकले नाही. पण, सलमान खानच्या संपर्कात आहे. सलीम सर आता ठीक आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना आता कोणताही धोका नाही.

हेल्थ बुलेटिनमध्ये सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली गेल्याने सलमान खान नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर जलील पारकर म्हणाले होते की, त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. जेव्हा त्यांना विचारले गेले की, त्यांना कधी डिस्चार्ज मिळेल? त्यावेळी ते म्हणाले की, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

यादरम्यान, अरबाज खानची एक्स पत्नी मलायका अरोरा, अमृता अरोरा, संजय दत्त, आमिर खान व त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, रणवीर सिंह, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान, फराह खान, जावेद खान, साजिद नाडियादवाला, मधुर भांडारकर हे कलाकार त्यांना भेटण्यासाठी गेले होते.