Salim Khan Health Update: लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. सलीम खान यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह सलमान खान देखील रुग्णालयात आहे. सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आज डॉक्टर माहिती देणार आहेत.

सलीम खान त्यांच्या मुलांबद्दल बऱ्याच गोष्टी, जुने किस्से सांगत असतात. सलमान खानच्या लग्नाबद्दल त्याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी वेळोवेळी आपली मते व्यक्त केली आहेत. अलीकडेच त्यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी सलमानच्या लग्नाबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

सलमान खानच्या विचारात विरोधाभास आहे – सलीम खान

सलीम खान यांच्या मते, सलमानच्या विचारात एक प्रकारचा विरोधाभास आहे. सलमान अशा मुलींकडे आकर्षित होतो ज्या चित्रपटसृष्टीत काम करतात आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. मात्र, लग्नाचा विचार येतो तेव्हा त्याला अशी पत्नी हवी असते जिने आपले करिअर सोडून घरात लक्ष द्यावे. कोमल नाहटाशी बोलताना सलीम खान म्हणालेले, “त्याच्या विचारात एक विरोधाभास आहे, हेच त्याचे लग्न न होण्याचे एक कारण आहे. सलमान बरेचदा ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्या खूप सुंदर मुली असतात. एकत्र काम करताना ते एकमेकांकडे एक आकर्षण असते. कारण ते एकत्र एकाच वातावरणात काम करतात. सलमानच्या बाबतीत ९०% वेळा तो त्याच्या चित्रपटाच्या हिरोईनच्या प्रेमात पडतो. पण फिल्म इंडस्ट्रीत येणाऱ्या मुली खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांचं लक्ष करिअर बनवण्यावर असतं. यात काहीही चूक नाही, पण सलमान लग्न करून त्यांना घरी बसवू इच्छितो.”

सलमान खान गर्लफ्रेंडला बदलण्याचा प्रयत्न करतो- सलीम खान

सलमानला वाटतं की त्याच्या बायकोने घर सांभाळावं व मुलांची काळजी घ्यावी. “सलमान खान कमिटमेंट देतो, मग गर्लफ्रेंडला भेटू लागतो, तेव्हा तो त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यामध्ये तो त्याची आई शोधतो. ते शक्य नाही. त्याला वाटतं की तिने त्याच्या आईप्रमाणे मुलांना शाळेत सोडावं. त्याला वाटते की तिने मुलांसाठी नाश्ता बनवावा, त्यांना त्यांचा होमवर्क करायला लावावा. एक सामान्य आई घरी जे करते ते त्याच्या बायकोने लग्नानंतर करावं असं त्याला वाटतं. पण जर तो चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मुलीकडून अशी अपेक्षा करत असेल तर ते शक्य नाही. त्या मुलीने प्रयत्न केला तरी ते शक्य नाही,” असं सलीम खान म्हणाले होते.

सलीम खान सलमान खानशी सहा महिने बोलले नव्हते. तो किस्सा त्यांनी स्वतः सांगितला होता. “हो, एकदा तसं घडलं होतं. जर त्याने मला आवडत नाही, असं काही केलं असेल, त्याने काहीतरी चुकीचं केलंय असं मला वाटतं तेव्हा मी त्याच्याशी बोलत नाही. मग, जर मी खिडकीजवळ बसलो असेल, तर तो पॅरापेटवरून चालत जायचा. तो मला न भेटताच घरातून पळून जायचा. नंतर, तो परत येऊन म्हणत असे, ‘सॉरी, मी जे केलं ते बरोबर नव्हतं’,” असं सलीम खान म्हणाले होते.