Salim Khan and Helen Love Story: बॉलीवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पहिली पत्नी सलमा खानबरोबर सुखाचा संसार सुरू असताना सलीम खान अभिनेत्री हेलनच्या प्रेमात पडले आणि त्यांनी दुसरे लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय खान कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी होता. सलमान खान आणि अरबाज खान यांनी सुरुवातीला हेलन यांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. आईला रडताना पाहून सलमानला वडिलांचा प्रचंड तिरस्कार वाटायचा. सलीम खान यांनी या लग्नाला एक ‘भावनिक अपघात’ असं म्हटलं होतं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आज हे कुटुंब एकोप्याने कसे राहते, याचे गुपित सलीम खान यांनी स्वतः उघड केले आहे.
‘डीएनए’ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान सलमा आणि हेलनबद्दल बोलले होते. “मी नशीबवान आहे की मला दोन बायका आहेत आणि त्या एकोप्याने राहतात. माझ्या दोन्ही पत्नी दिसायला सुंदर आहेत आणि आता त्या वृध्द होत आहेत.” सलीम खान यांनी त्या तेव्हा कबूल केलं होतं की सुरुवातीच्या काळात त्यांच्या मुलांचा या गोष्टीला प्रचंड विरोध होता. सलमाने देखील वडिलांचं हेलनसोबतचं नातं स्वीकारलं नव्हतं. “लहानपणी त्यांच्यात वैर होतं. त्यांनी तेच केलं जसं तिची आई वागत होती, गोष्टी सुरळीत व्हायला बराच वेळ लागला, पण नंतर सगळं ठीक झालं,” असं त्यांनी म्हटलं होतं.
माझी आई दुखावली होती – सलमान खान
सलीम आणि सलमा यांची मुलं सलमान खान आणि अरबाज खान यांनी त्यांच्या वडिलांच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल आणि त्याचा त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम झाला याबद्दल भाष्य केलं होतं. १९९० मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला होता, “माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न केल्यावर माझी आई खूप दुखावली होती. जेव्हा ती माझ्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहत असायची, तेव्हा मला त्यांचा तिरस्कार वाटायचा.”
हेलन आंटीला स्वीकारायला खूप वेळ लागला – सलमान खान
यानंतर सलीम यांनी सलमानला सांगितलं होतं की पुन्हा लग्न केल्यानंतरही ते आपली पहिली पत्नी मुलांच्या जवळ असतील. काही काळाने त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. “वडिलांनी आम्हाला समजावून सांगितलं होतं की ते अजूनही आईवर खूप प्रेम करतात आणि ते त्यांच्याजवळच राहतील. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो आणि हेलन आंटीला स्वीकारायला आम्हाला बराच वेळ लागला. आता त्या आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत,” असं सलमान खान म्हणाला होता.

अरबाजला वडील काय म्हणाले होते?
अनेक दशकांनंतर अरबाजने ‘इ-टाइम्स’शी बोलताना वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. “जेव्हा या गोष्टीवरून कुटुंबात बदल होत होते, तेव्हा मी खूप लहान होतो. पण मला आठवतं की वडिलांनी आम्हाला कधीही हेलन यांच्यावर आमच्या आईइतकं प्रेम करण्यास सांगितलं नाही. ते म्हणाले होते की ‘तुम्ही हेलनला आदर द्यावा, इतकीच माझी अपेक्षा आहे, कारण कारण ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे हे तुम्हाला स्वीकारावे लागेल’,” असं अरबाजने सांगितलं होतं.
दरम्यान, सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाजशी संवाद साधताना हेलन व त्यांच्या नात्याल भावनिक अपघात संबोधलं होतं. “ती तरुण होती, मीही तरुण होतो. मी ते हेतूपूर्वक केलं नव्हतं. हा एक भावनिक अपघात होता, जो कोणासोबतही घडू शकतो,” असं ते म्हणाले होते.
