Salim Khan’s Doctor Shares Health Update: ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची मंगळवारी (१७ फेब्रुवारी रोजी) सकाळी प्रकृती बिघडली. ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलीम खान यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना लीलावतीचे डॉ. जलील पारकर म्हणाले, “त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. आज सकाळी त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. सलीम खान आता बरे आहेत व स्थिर आहेत, पण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. उद्यापर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरून काढू, अशी आशा आहे. त्यांचे वय जास्त असल्याने रिकव्हरीला जास्त वेळ लागेल.”

सलीम खान यांचा रक्तदाब वाढला होता, असंही डॉक्टरांनी सांगितलं. ते रुग्णालयात आले तेव्हा त्यांची प्रकृती अजिबात बरी नव्हती. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात नेलं होतं, असंही डॉक्टरांनी नमूद केलं.

मंगळवारी सकाळी नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, मंगळवारी सकाळी ८:३० वाजता सलीम खान यांना त्यांच्या पर्सनल डॉक्टरांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर सलमान खान लगेचच रुग्णालयात पोहोचला. वडिलांना भेटल्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला. पण सलमानच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्यानंतर अरबाज खान, शूरा खान, हेलन, सलमा खान, अलविरा अग्निहोत्री आणि कुटुंबातील इतर सदस्यही सलीम खान यांना भेटायला रुग्णालयात आले. त्यानंतर जावेद अख्तर व संजय दत्तदेखील रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात आले होते. सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याचं समजताच चाहते ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

सलीम खान यांचे गाजलेले चित्रपट

सलीम खान हे एक ज्येष्ठ बॉलीवूड पटकथा लेखक आहेत. त्यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर १९७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांचे सर्वात गाजलेले चित्रपट म्हणजे शोले (१९७५), दीवार (१९७५), जंजीर (१९७३), डॉन (१९७८), सीता और गीता (१९७२) आणि मिस्टर इंडिया (१९८७) होय.

सलीम खान यांचे कुटुंब

सलीम खान यांनी दोन लग्ने केली असून, त्यांचे सर्व मुलं आणि दोन्ही पत्नी एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहतात. सलीम खान यांनी १९६४ मध्ये सुशीला चरक यांच्याशी लग्न केले. त्या सलमान खान, अरबाज, अलविरा आणि सोहेल यांच्या आई आहेत. १९८१ मध्ये सलीम खान यांनी प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले. अर्पिता ही सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे, जिला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे मोठं केलं.