बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर १४ एप्रिल रोजी दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तपास करून दोन्ही आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेतलं होतं. विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनाही याप्रकरणी २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सलमानच्या घरावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी फेसबुक पोस्ट शेअर करत लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल यांने स्वीकारली होती. हा तर फक्त ट्रेलर आहे असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यामुळे या घटनेमागील खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईला ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून घोषित केलं आहे.

हेही वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींच्या भावोजींचा रस्ते अपघातात मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर

“सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई यांना ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून घोषित केले आहे.” अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना बिश्नोई बंधूंकडून कथितपणे सूचना मिळत होत्या असंही त्यांनी सांगितलं. लॉरेन्स सध्या गुजरात येथील तुरुंगात आहे, तर त्याचा भाऊ कॅनडा किंवा अमेरिकेत असल्याचं समजतं आहे. मुंबई पोलीस लवकरच लॉरेन्सचा ताबा घेणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Video: भाऊ कदम यांच्या लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखेने आयपीसी कलम ५०६ (२) (मृत्यूची धमकी देऊन किंवा गंभीर दुखापत करून गुन्हेगारी धमकी) आणि २०१ (पुरावा गायब करणे किंवा संरक्षणासाठी खोटी माहिती देणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या निवासस्थानावर दोन व्यक्तींनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.