This Film Saved Sanjay Leela Bhansali’s Career : संजय लीला भन्साळी बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ९० च्या दशकापासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांवर आधारित चित्रपटांचं त्यांच्या ‘हटके’ पद्धतीनं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कायमच त्यांच्या चित्रपटांबद्दल उत्सुकता असते.

संजय लीला भन्साळी त्यांच्या आगळ्या दिग्दर्शन शैलीव्यतिरिक्त ते कामाप्रति असलेली शिस्त आणि प्रत्येक कलाकृतीमधील सर्जनशीलता यांसाठीही ओळखले जातात. त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक करत असतात आणि ते याबाबत खूप कडक शिस्तीचे असल्याचं म्हणताना दिसतात. सध्या संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांची प्रकृती बिघडली होती; परंतु आता ते सुखरूप असल्याचं म्हटलं जात आहे.

संजय लीला भन्साळी आज जरी बॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असले तरी संघर्ष त्यांनाही चुकला नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांनाही संघर्ष करावा लागला होता. १९९६ मध्ये त्यांनी ‘खामोशी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं; मात्र तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यावेळी संजय यांचं करिअर धोक्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ते भारतीय सिनेमामधील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखू लागले आणि मग ते करिअरमध्ये यशाच्या शिखरावर गेले.

‘हा’ चित्रपट ठरला संजय लीला भन्साळींच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

संजय लीला भन्साळी यांचं करिअर धोक्यात असताना ;हम दिल दे चुके सनम; या चित्रपटानं त्यांना नवीन आशा दिली. १९९९ मध्ये रीलीज झालेल्या या रोमँटिक चित्रपटात ऐश्वर्या राय, सलमान खान, अजय देवगण व माधुरी दीक्षित हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. ;’हम दिल दे चुके सनम’; हा चित्रपट एका अशा नवविवाहित पुरुषाची गोष्ट सांगतो, ज्याला त्याच्या लग्नानंतर समजतं की, त्याची पत्नी तिच्या भूतकाळातील एका व्यक्तीच्या प्रेमात आहे. म्हणून तो त्यांना एकत्र आणण्याचं ठरवतो. आजही प्रेक्षक हा चित्रपट खूप आवडीनं पाहतात.

संजय लीला भन्साळींच्या कारकिर्दीतील ‘हम दिल दे चुके सनम’ हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट बंगाली नाटकावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला फिल्मफेअरचे सात पुरस्कारही मिळाले होते. न्यूज १८च्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांनी मागे एका मुलाखतीत त्यांच्या या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली. संजय लीला भन्साळी याबद्दल म्हणालेले की, ‘हम दिल दे चुके सनम’पूर्वी मी ‘खामोशी’ नावाचा चित्रपट बनवला होता, ज्यामुळे माझं करिअर सुरू होण्याआधीच संपलं होतं.

दरम्यान, या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांनी अनेक लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या चित्रपटांसाठी निवडलं. संजय लीला भन्साळी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.