शाहरुख खान आणि सलमान खान यांनी पहिल्यांदा ज्या सिनेमात एकत्र काम केलं तो सिनेमा म्हणजे ‘करण अर्जुन.’ या सिनेमाच्या अनेक रंजक गोष्टी आहेत. सिनेमासंबंधित अनेकांनी शाहरुख-सलमानबद्दलचे किस्से सांगितले असतील. अशातच सिनेमाच्या कोरिओग्राफरनं एक खुलासा केला आहे, तो म्हणजे शाहरुख आणि सलमान यांनी सेटवर मारामारी केली होती.
कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी नुकत्याच एका संवादात शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या ‘करण-अर्जुन’च्या सेटवरील हा मारामारीचा किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितले की, सेटवर गावातील काही मुलांनी मुलींशी गैरवर्तन केलं होतं. तेव्हा शाहरुख आणि सलमान दोघांनीही त्या मुलींना टवाळ मुलांपासून वाचवलं होतं.
चिन्नी यांनी सांगितले की, “राजस्थानच्या एका ग्रामीण भागात ‘भांगडा पाले’ या गाण्याचे शूटिंग करताना हा प्रसंग घडला. शूटिंगदरम्यान गावातील काही लोक मुलींना त्रास देऊ लागले. ते पाहून सलमान खूप रागावला, तर शाहरुखने काठी उचलून त्यांना मारायला सुरुवात केली. यानंतर मोठं भांडण सुरू झालं. मग सलमान, मी आणि शाहरुख… आम्ही त्या मुलींना एका व्हॅनमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेले.”
यापुढे ते म्हणाले, “करण-अर्जुन सिनेमातील ‘भांगडा पाले’ हे गाणं खूपच आयकॉनिक होतं; कारण दोन हिरो सिनेमात एकत्र नाचत होते. त्यादरम्यान, सलमानशी माझे जरा चांगले संबंध होते, कारण मी त्याचा दुसरा चित्रपट केला होता. शाहरुखशी मात्र फारशी मैत्री नव्हती.”
दरम्यान, ‘करण-अर्जुन’ हा सिनेमा १९९५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि बॉक्स ऑफिसवरही चांगलं यश मिळालं. त्यानंतर शाहरुख खान आणि सलमान खान अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले, पण मुख्य भूमिकांत दोघे पुन्हा एकत्र पाहायला मिळाले नाहीत.
सलमान आणि शाहरुख सध्या त्यांचे स्वतंत्र सिनेमे करत आहेत. शाहरुख लवकरच बहुचर्चित ‘किंग’मध्ये दिसणार आहे. नुकतीच त्याची छोटीशी झलक शेअर करण्यात आलीय, तर सलमान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसंच तो ‘बिग बॉस १९’चं होस्टिंगही करत आहे.
