सलमान खानचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. भाईजानची एक झलक दिसावी, यासाठी चाहते त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गर्दी करत असतात. इतकंच नाही तर विमानतळ व इतर सार्वजनिक ठिकाणीही सलमान खानबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड असते. सलमान खान बरेचदा चाहत्यांबरोबर फोटो काढतो, त्यांच्याशी प्रेमाने बोलत असतो. अशातच त्याचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नुकतीच सलमान खानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्यावर भडकल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान खान सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात एका विमानतळावरून बाहेर पडत असताना, गर्दीत एका उत्साही चाहत्याने सलमानच्या जवळ येऊन फोटो काढण्याच्या प्रयत्नात त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चाहत्याने परवानगीशिवाय खांद्यावर हात ठेवलेलं सलमानला आवडलं नाही. त्याने तात्काळ त्या चाहत्याचा हात झटकला आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं.
या घटनेनंतर सलमानच्या बॉडीगार्ड्सनी तात्काळ त्या चाहत्याला बाजूला केलं आणि सलमान पुढे आला. तिथे एक लहान मुलगा भाईजानबरोबर फोटो काढण्यासाठी आला. सलमान त्याच्याजवळ उभा राहिला आणि फोटोसाठी पोज दिली.
पाहा सलमान खान व्हिडीओ
सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान बाहेर गेल्यावर फारसा लोकांमध्ये मिसळत नाही. त्याचे बॉडीगार्ड्स त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्याभोवती गराडा करून चालत असतात. अशातच एका चाहत्याने अचानक खांद्यावर हात ठेवल्याने सलमान खान भडकला.
सलमान खानचा आगामी चित्रपट
दरम्यान, सलमान खानचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. ए.आर. मुरुगदास यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुमारे २०० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, परंतु त्याने जगभरात फक्त १७६ कोटींचे कलेक्शन केले. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ (Maatrubhumi: May War Rest in Peace) याच्या प्रदर्शनाबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. सुरुवातीला हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही ताज्या बातम्यांनुसार, या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता असून तो आता १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा आहे. पण अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
