Salman Khan angry on paparazzi : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा पापाराझींवर चिडल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर सलमान खानचे रागाने पापाराझींकडे चालल्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी गेलेल्या सलमानचे फोटो काढल्यामुळे त्याचा राग अनावर झाला. पापाराझींवर रोष व्यक्त करीत त्याने इन्स्टाग्रामवरदेखील त्यांची कानउघाडणी केली. ६० वर्षांचा झालो असलो तरी भांडण करायला विसरलेलो नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया सलमानने दिली आहे.
पापाराझी रुग्णालयाच्या आवारात शिरले अन्
अभिनेता सलमान खान मंगळवारी रात्री उशिरा हिंदुजा रुग्णालयामध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी गेला होता. सिग्नलपासूनच पापाराझींनी त्याच्या गाडीमागे धावून त्याचे फोटो-व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली. तरीही दुर्लक्ष करीत सलमान खान रुग्णालयाच्या आवारामध्ये गेला आणि रुग्णाची भेट घेऊन परत आला. मात्र, आल्यानंतर सलमान खानने पाहिले की, पापाराझी रुग्णालयाच्या आवारामध्ये शिरून, त्याचे फोटो घेण्यासाठी गोंधळ घालत होते. मग सलमान खानचा पारा चढला आणि तो रागाने पापाराझीच्या दिशेने चालू लागला. त्या प्रसंगाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, सलमानच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे दिसून येत आहे.
पापाराझींचे रुग्णालयात गैरवर्तन
सलमान खानच्या फोटोसाठी पापाराझी रुग्णालयाच्या आवारामध्ये शिरले. जोरजोरात भाई.. भाई… फोटो आणि मातृभूमी, असे आवाज देत सलमानचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते. रुग्णाला भेटायला तो गेला असताना ते आगामी चित्रपटाबद्दल त्याला प्रश्न विचारत होते. रुग्णालयाच्या आवारामध्ये इतर रुग्णही असताना पापाराझींनी केलेले ते वर्तन सलमान खानला आवडले नाही.
पापाराझींच्या त्या वर्तनामुळे सलमानचा संयम सुटला. तो, “पापाराझींना काय वेडेपणा सुरू आहे? तुमच्या जवळचे लोक अॅडमिट असते, तर हेच केले असते का?” असे म्हणत तो पापाराझींच्या दिशेने रागाने चालू लागला. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमानने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून, फोटोग्राफर आणि पापाराझींच्या त्या वर्तणुकीवरून त्याची कानउघडणी केली.
६० वर्षांचा झालोय; पण हे लक्षात ठेवा…
सलमान खानने इन्स्टाग्रामवर त्याचे चार फोटो शेअर करीत मी ६० वर्षांचा झालो असलो तरी भांडण करायला विसरलेलो नाही, अशा शब्दांद्वारे त्याची आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. सलमान खानने घडलेल्या घटनेवर रोष व्यक्त करीत लिहिले की, फोटो काढणे हे पापाराझींच्या पोटापाण्याचे काम आहे हे मलाही माहीत आहे. त्यामुळेच मी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पण, आज त्याच पापाराझींना हॉस्पिटलबाहेर मी माझ्या दु:खावर हसताना पाहिले. दुसऱ्याच्या दु:खातून जर त्यांना पैसा कमवायचा असेल, तर ते चुकीचे आहे आणि मी हे होऊ देणार नाही. फोटो महत्त्वाचा आहे की एखाद्याचे आयुष्य… ‘मातृभूमी’ चित्रपटाचे नाव घेत ‘भाई भाई भाई…’ म्हणून आवाज देतात… अरे, मी असे १०० सिनेमे बनवेन… हे असे वर्तन पुन्हा करून दाखवा, मग तुम्हाला दाखवतो. तुमच्या जवळचे कोणी रुग्णालयात असेल आणि मीसुद्धा तिथे येऊन असाच वागलो तर? ६० वर्षांचा झालोय; पण हे लक्षात ठेवा.. मी अजूनही तुमच्या चुका जिथल्या तिथे तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्याशी भांडू शकतो आणि नंतर जेलमध्ये टाकाल…? , असे सलमान खान म्हणाला आहे.
