Salman Khan Arpita Raksha Bandhan Jesus photo : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने उत्साहामध्ये रक्षाबंधन सण साजरा केला. बहीण अर्पिता खान शर्माने सलमानला राखी बांधत भावंडांमधील प्रेमाचं नातं जपलं. या खास क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. येशू ख्रिस्त यांच्या फोटोसमोर अर्पिताने सलमानला राखी बांधल्यानं या रक्षाबंधनाच्या क्षणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अर्पिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सलमानचं औक्षण करताना आणि त्याला राखी बांधताना दिसत आहे. यावेळी सलमानच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळतो. अर्पिता व सलमान खानच्या या भावूक क्षणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी त्यांच्या मागे असलेल्या येशू ख्रिस्तांच्या फोटोनं लक्ष वेधलं आहे. रक्षाबंधन करताना सलमान व अर्पिताच्या मागे ‘द लास्ट सपर’चे चित्र असून हे सर्वांत ‘सेक्युलर’ रक्षाबंधन असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सोशल मीडियावर सलमान-अर्पिताच्या रक्षाबंधनाची चर्चा

सलमान व अर्पिताच्या या रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर करत एका नेटकऱ्यानं लिहिलं, “इंटरनेटवरील हा सर्वात धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) व्हिडीओ आहे. एका हिंदू पुरुषाशी (आयुष शर्मा) विवाह झालेली मुस्लीम तरुणी (अर्पिता खान) आपल्या मुस्लीम भावाला (सलमान खान) राखी बांधत आहे आणि मागे येशू ख्रिस्तांचे चित्र दिसत आहे.”

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्यानं लिहिलं, “सलमान खान अशी व्यक्ती आहे, जी प्रत्येक सण तितक्याच उत्साहाने साजरी करतो. तो सर्व धर्मांचा मान राखतो, म्हणूनच मला तो खूप आवडतो.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “सलमान खानचं घर म्हणजे पूर्ण हिंदुस्तान आहे.” एका नेटकऱ्यानं लिहिलं, “ही खरी श्रीमंती आहे.”

सलमान खान सर्व धर्मांचे सण उत्साहात करतो साजरे

सलमान खानच्या घरामध्ये हिंदू-मुस्लीम असा भेदभाव नसून ते प्रत्येक सण तितक्याच उत्साहाने साजरा करतात. यापूर्वी अनेकदा अर्पिताने प्रेमाने भावांना राखी बांधल्याचे फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये वाजत-गाजत गणपती बाप्पाचे स्वागत केले जाते. तसेच सलमान खान ईद हा सणसुद्धा उत्साहामध्ये साजरा करताना दिसून येतो.

दरम्यान, लवकरच सलमान खान हिंदी ‘बिग बॉस’चा २० वा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर त्याचा ‘मातृभूमी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप ‘मातृभूमी’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी सलमान खानने हॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून ‘७ डॉग्स’ सिनेमामध्ये तो भूमिका साकारणार आहे.