‘बिग बॉस’ सीझन २०च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान ट्रोलर्सना चांगलंच सुनावताना दिसला. त्याच्या बदललेल्या शरीरयष्टीवर कमेंट करणाऱ्यांना उत्तर देताना त्याने आपली जुनी मैत्रीण आणि सहकलाकार कतरिना कैफला पाठिंबा दिला.
मुंबईत याच आठवड्यात अंबानी कुटुंबाच्या गणपती उत्सवाला हजेरी लावल्यानंतर कतरिना कैफला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर तिचं वजन वाढल्यामुळे अनेकजण तिच्यावर टीका करत आहेत. कतरिनाच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे आले आहेत. आता सलमान खाननेही कतरिनाची बाजू घेत ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.
शनिवारच्या ‘बिग बॉस २०’च्या एपिसोडमध्ये सलमान खानने या आठवड्यात स्पर्धकांमध्ये झालेल्या एका वादाचा मुद्दा उपस्थित केला. टास्कदरम्यान झालेल्या भांडणानंतर यूट्यूबर ScoutOP ने त्याच्या यूट्यूब आणि गेमिंग कम्युनिटीला अरिश्फा खानला उद्देशून “संपवून टाका हिला” असं म्हटलं होतं. या वक्तव्याचा सलमानने निषेध केला. सोशल मीडियावर पैसे कमावणारे काही लोक इतरांच्या दिसण्यावरून, शरीरयष्टीवरून कमेंट करत त्यांना ट्रोल करतात, यावरही त्याने भाष्य केलं.
सलमान खानने ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं
सलमान खान म्हणाला, “दुसऱ्याला कमी लेखून तुम्ही पैसे कमावता.” सेलिब्रिटींची शरीरयष्टी, वजन, दिसणं, कुटुंब, करिअरमधील अपयश, तसेच मातृत्वासारख्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवरून ट्रोलर्स त्यांना लक्ष्य करत असल्याचंही त्याने सांगितलं. पुढे तो म्हणाला, “अशा कमेंट्समधून तुम्ही तुमच्यावर झालेले संस्कारच दाखवत आहात.”

सलमान खानचा कतरिनाला पाठिंबा
कतरिना कैफला प्रेग्नन्सीनंतर ट्रोल केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सलमान खानने प्रश्न उपस्थित केला की, नुकतीच आई झालेल्या अभिनेत्रीच्या वजनावर आणि दिसण्यावरून लोक कमेंट का करत आहेत? तो म्हणाला, “गरोदरपणानंतर प्रत्येकाचं वजन वाढतं. चित्रपटांमध्ये परतल्यानंतर कतरिना पुन्हा फिट होईल”. तसंच, कतरिनाला तिच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवू द्यायला हवा, असंही सलमानने सांगितलं.
पुढे सलमान खानने ट्रोलर्सवर टीका करताना म्हटलं की, काही लोक अनोळखी किंवा खोट्या अकाउंमार्फत इतरांना ट्रोल करतात.“स्वतःच्या दिसण्याबद्दलच इतके नाराज आहात, तर दुसऱ्याच्या रूपावर आणि वजनावर कमेंट का करता”, असा सवाल त्याने केला. सलमानने स्वतःला ट्रोल केल्याचाही अनुभव सांगितला. लोकांना इतरांच्या अपयशाचा आनंद होतो आणि वय वाढल्यावरही ते सेलिब्रिटींना लक्ष्य करतात, असं तो म्हणाला. “महातारा झाला. हो कारण मी ६० वर्षांचा आहे” असं म्हणत त्याने पुढे स्पष्ट केलं, “तुम्ही कायम मैने प्यार किया मधला सलमान राहू शकत नाही.”
अशा प्रकारे ट्रोल करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे, असा सवालही सलमानने केला. “व्हॉट डू यू वॉन्ट टू ट्रोल अँड व्हाय डू यू वॉन्ट टू ट्रोल?” असं म्हणत त्याने लोकांना प्रश्न विचारला. काही निर्माते किंवा कलाकार सेलिब्रिटींना सोशल मीडियावर लक्ष्य करण्यासाठी लोकांना पैसे देऊन अशा प्रकारचं ट्रोलिंग घडवून आणत असावेत, असा आरोपही त्याने केला.
