Salman Khan Fans Express Disappointment : सलमान खान त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील ‘मातृभूमी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर नुकतंच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी ‘मैं हूं’ हे दुसरं गाणंसुद्धा रिलीज झालं आहे. पण, या गाण्यामुळे सलमानचे चाहते नाराज झाले आहेत. चाहत्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्तही केली आहे.
‘मैं हूं’ या गाण्यातून सैनिकाच्या कुटुंबाचा भावनिक प्रवास दाखवला गेला आहे. गाण्यातून कुटुंबाबरोबरचे आनंदाचे काही क्षण दाखवले गेले आहेत; पण संरक्षणाच्या कर्तव्यामुळे येणारा दुरावाही यातून दिसतोय. हे गाणं अभिनेत्री कुनिका सदानंद यांचा मुलगा अयान लाल यानं संगीतबद्ध केलं असून, श्रेया घोषालसह त्यानं ते गायलंसुद्धा आहे. तसेच अयान आणि शब्बीर अहमद यांनी गीतलेखन केलं आहे.
सलमानच्या चाहत्यांनी मात्र या गाण्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. काहींनी त्याच्यावर थेट टीकाच केली आहे. एका युजरनं लिहिलं, “सलमानभाई, तुम्ही तुमच्या करिअरकडे गांभीर्यानं कधी पाहणार आहात?” तर दुसऱ्यानं स्पष्ट शब्दांत म्हटलं, “हे सांगताना वाईट वाटतं, पण हा चित्रपट फ्लॉप होईल, असं वाटतं. सलमानभाई, आता बस करा, हात जोडून विनंती आहे.” आणखी एका चाहत्यानं! सल्ला देत, “भाई, जर तुम्हाला चित्रपट करायची इच्छा नसेल, तर कृपया निवृत्ती घ्या”, असं म्हटलंय.
सलमानच्या चित्रपटांचा दर्जा खूप खालावलाय
काही चाहत्यांनी सलमानच्या अलीकडच्या चित्रपटांबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरनं लिहिलं, “२०१८ नंतर सलमानच्या चित्रपटांचा दर्जा खूपच खालावला आहे. काही सीन्स तर अगदीच कृत्रिम वाटतात.” आणखी एका चाहत्यानं लिहिलं, “या गाण्यानंतर मला चित्रपटाकडून फारशी अपेक्षा उरलेली नाही; पण तरीही माझं सलमानवर प्रेम आहे आणि ते शेवटपर्यंत राहील”. एकूणच, चाहत्यांमध्ये सलमानविषयी प्रेम आणि नाराजी अशा दोन्ही भावना आहेत.
सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’बद्दल…
दिग्दर्शक अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट २०२० मध्ये झालेल्या गलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहेत. ते १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते आणि पीएलए सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले होते. सलमानसह या चित्रपटात चित्रांगदा सिंग, झेन शॉ, अंकुर भाटिया व विपीन भारद्वाज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

