Salman Khan Bodyguard Shera Son Abeer Singh Bollywood Debut: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबरोबर नेहमी त्याचा बॉडीगार्ड शेरा दिसून येतो. शेरा व सलमान खान यांच्यामध्ये प्रचंड जिव्हाळा असून, तो सावलीप्रमाणे सलमान खानबरोबर असतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह चर्चेत आला आहे. अबीर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंह हा ‘टार्जन’ नावाच्या सिनेमातून पदार्पण करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सूरज पंचोलीही दिसू शकतो. सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंह जॉली ऊर्फ शेराचा मुलगा अबीरच्या बॉलीवूड पदार्पणाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सलमान खान स्वतः अबीरसाठी चित्रपट तयार करणार असल्याची चर्चा
अबीरच्या पदार्पणाची चर्चा पहिल्यांदा २०२२ मध्ये झाली होती. त्यावेळी सलमान खान स्वतः अबीरसाठी पहिला चित्रपट तयार करणार असल्याचे बोलले जात होते. त्याच्या दिग्दर्शनासाठी सलमानने दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशीही चर्चा केल्याचं सांगितलं जात होतं. जानेवारी २०२३ पासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती; मात्र या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा कधीच झाली नाही. मार्च २०२३ मध्ये सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अबीरच्या पदार्पणाबाबतही फारशी माहिती समोर आली नाही.

आता पुन्हा एकदा अबीर हा ‘टार्जन’मधून बॉलीवूडमध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामध्ये सूरज पंचोलीसुद्धा झळकण्याची शक्यता आहे. सूरजने सलमानने निर्मिती केलल्या हीरो या सिनेमातून २०१५ साली पदार्पण केले होते. त्यामध्ये त्याने सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसह स्क्रीन शेअर केली होती. मात्र, त्यानंतर जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे तो कायदेशीर चौकटीत अडकला होता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा ‘टार्जन’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

शेराचा मुलगा अबीरच्या बॉलीवूडमधील पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सलमान खान या प्रोजेक्टशी जोडला जाणार का, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे.
