Salman Khan Behavior on set: सलमान खान सध्या त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे चर्चेत आहे. सलमान खानची अत्यंत जवळची मैत्रीण कुमुद राणेचे निधन झाले आहे. तिच्या निधनानंतर तो भावुक झाला होता. त्याचे रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता मात्र सलमान खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कोरिओग्राफर शबिना खानने सलमान खानबद्दल वक्तव्य केले आहे. तो सेटवर इतरांशी कसे वागतो, याबद्दल तिने सांगितले आहे.

अलीकडे कलाकारांच्या entourage cost (कलाकारांबरोबर असणाऱ्या संपूर्ण टीमचा खर्च)बद्दल मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. कलाकारांच्या अनेक व्हॅनिटी व्हॅन्स आणि मोठ्या टीममुळे चित्रपटाचे बजेट वाढते, असे अनेकांनी म्हटले आहे. या सगळ्यात लोकप्रिय कोरिओग्राफर शबिना खानने सलमान खानबद्दल एक वेगळाच अनुभव सांगितला आहे.

शबिनाने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “आजकाल अनेक प्रमुख कलाकारांसोबत किमान १५ जणांची टीम असते. सेटवर कोणाला त्या कलाकाराशी बोलायचे असल्यास त्यांना थेट कलाकाराशी बोलायची परवानगी नसते. जोपर्यंत तुम्ही स्वतः नाव कमावलेले नसते, तोपर्यंत तुम्हाला प्रमुख कलाकाराशी थेट बोलता येत नाही. त्यांची टीम म्हणते की, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. सलमान खान मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो सर्वांबरोबर बोलतो आणि त्यामुळे सेटवरील इतर कलाकारही तसेच वागतात. सलमान सर्वांशी बोलतो.”

“तो प्रत्येकाच्या जेवणाची…”

पुढे सलमान खानबद्दल ती असेही म्हणाली, “तो प्रत्येकाच्या जेवणाची विशेष काळजी घेतो. प्रत्येकाला जेवण मिळाले पाहिजे याकडे त्याचे लक्ष असते. अनेक चित्रपटांच्या सेटवर कलाकार आणि विभागप्रमुखांना वेगळे व अधिक चांगले जेवण दिले जाते; तर स्पॉटबॉय, लाईटमन आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था असते. मात्र, सलमान खान ज्या सिनेमात काम करत असतो, त्या सेटवर असा भेदभाव केला जात नाही. सर्वांना एकाच प्रकारचे चांगले जेवण मिळते.”

‘प्रेम रतन धन पायो’च्या शूटिंगच्या वेळचा अनुभवही तिने सांगितला. ती म्हणाली, “राजश्री प्रॉडक्शनच्या सेटवर नॉनव्हेज मिळत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. ज्यांना मांसाहार करायचा आहे, त्या लोकांसाठी सलमान खास व्यवस्था करत असे. सेटवर सलमानसाठी खास बंगला उभारलेला असे. तो तिथे सर्वांना जेवायला बोलावत असे. त्याच्याकडे ७ स्टार हॉटेलसारखे जेवण मिळे. तो फक्त कलाकारांनाच नाही, तर ज्युनियर आर्टिस्ट, डान्सर्स सर्वांना जेवायला बोलावत असे.”

आता सलमान खान त्याच्या बिईंग ह्युमन या कंपनीची किचन व्हॅन सेटवर आणतो. तेथील मेन्यू ठरलेला असतो; पण कोणाला दुसरे काही खाण्याची इच्छा असेल, तर तेही लगेच बनवून दिले जाते.

याआधी अभिनेत्री कुब्रा सैतनेदेखील सलमान खान सेटवर कशी वागणूक देतो याबद्दल सांगितले होते. रेडी या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव तिने सांगितला होता. ती म्हणालेली की, मी आणि माझ्याबरोबरचे आणखी काही कलाकार सकाळपासून सेटवर थांबलो होतो. आम्ही फक्त दोन सफरचंदे खाल्ली होती. सलमान खान जेव्हा सेटवर आला तेव्हा त्याने आधी आम्हाला जेवण करण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही शूटिंग केले.