अभिनेता सलमान खानने त्याच्या जवळच्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेत गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्याची अत्यंत मजेदार शैलीत आठवण करून दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘द टक शॉप अॅट सॅव्हिओज’ (The Tuck Shop at Savio’s) या कॅफेचा व्हिडीओ शेअर करत सलमानने कॉफी रिफिल करण्याची मागणी केली. तसेच कॅफे चालवणाऱ्या मैत्रिणीला किंमत, दर्जा आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा सल्ला दिला.

सलमान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर त्याच्या मित्र-मैत्रिणींसाठी पोस्ट करत असतो. इतकंच नाही तर सामाजिक व राजकीय विषयांवरही तो व्यक्त होत असतो. आता सलमानच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. तुकाराम मुंढेंचा थेट उल्लेख करत सलमानने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करत सलमानने लिहिलं, “माझी कॉफी रिफिल करा प्लीज. किमती वाढवू नका आणि दर्जा टिकवून ठेवा. स्वच्छता ठेवा, नाहीतर मी ‘त्याला’ पाठवेन आणि कामच तमाम होईल.” सलमानने थेट तुकाराम मुंढे यांचं नाव घेतलं नसले तरी ‘HIM’ हा शब्द त्याने त्यांच्यासाठीच वापरला आहे. कारण एफडीए आयुक्त म्हणून मुंढे सध्या महाराष्ट्रातील हॉटेल आणि कॅफेंवर धडक कारवाई करत आहेत. सलमानने त्याच्या प्रसिद्ध “It’s done, bro” या संवादाला ट्विस्ट देत “It’s done sis” असा मेसेज लिहिला.

salman-khan-tukaram-mundhe-cafe-fda-action-instagram-story
सलमान खानची पोस्ट (सौजन्य- इन्स्टाग्राम)

तुकाराम मुंढे सध्या चर्चेत का आहेत?

२६ मे २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेच्या दृष्टीने धडक मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या पथकाने ३,००० हून अधिक ठिकाणी धाडी टाकून सुमारे १६५ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे त्यांना सोशल मीडियावर ‘रिअल लाईफ सिंघम’ म्हटलं जात आहे. अस्वच्छता, अन्नातील भेसळ, बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि विनापरवाना चालणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व कॅन्टीनवर एफडीएची ही कारवाई सुरूच आहे.

सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट्स

दरम्यान, सलमान खान लवकरच ‘बिग बॉस २०’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या नव्या पर्वाचा प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी जिओहॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर होणार आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान खान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. तसेच तो ‘मॉनस्टर’मध्येही झळकणार आहे. हा चित्रपट ईद २०२७ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.