अभिनेता सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने इन्स्टाग्रामवर लॉरेन्स बिश्नोईला सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिला होता, त्यामुळे ती मोठ्या चर्चेत आली होती. सध्या सोशल मीडियावरील ती पोस्ट तिने डिलीट केली असून यामध्ये तिने लॉरेन्स बिश्नाईला झूम कॉल करण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. आता तिने एका मुलाखतीत सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट शेअर करण्याचे काय कारण होते, यावर स्पष्टीकरण दिले आहे.
“लॉरेन्स बिश्नोईशी झूम कॉलवर बोलण्याचा हेतू हा…”
सोमी अलीने नुकतीच ‘हिंदूस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लॉरेन्स बिश्नोईबरोबर का संवाद साधायचा होता, यावर खुलासा केला आहे. तिने म्हटले, “लॉरेन्स बिश्नोईशी झूम कॉलवर बोलण्याचा, अशी पोस्ट शेअर करण्यामागे हेतू हा शांततेसाठी संवाद साधण्याचा होता. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने मी चिंतेत होते. अशी पोस्ट शेअर करण्यामागचा हेतू तणाव वाढवणे, निर्माण करणे हा नसून शांतता निर्माण करणे हा होता.”
पुढे तिने म्हटले, “आजची फिल्म इंडस्ट्री ही ९० च्या दशकातील इंडस्ट्रीपेक्षा वेगळी आहे. सुरक्षितता हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. विशेषत: महिलांसाठी हा चिंतेचा विषय आहे. प्रत्यक्षात मला कधी थेट धमक्यांचा सामना करावा लागला नसला तरीही काही अशा घटना घडल्या, ज्यामुळे मला अस्वस्थ वाटले.”
सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईबरोबर झूम कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त करणारी पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. यानंतर तिने ती पोस्ट डिलीट केली आणि ट्रोल करणाऱ्यांना संबोधित करत नवीन पोस्ट शेअर केली.
तिने तिच्या नवीन पोस्टमध्ये लिहिले, “ट्रोल करणारे तिरस्कार करण्यासाठी कारण शोधत असतात. परंतु, सगळीकडून वगळले जाणे हे त्यांना सर्वात जास्त निराश करते. अशा पद्धतीने ऑनलाइन ट्रोल करणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे; स्क्रीनपासून दूर राहा, बाहेर जा, आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा आणि तुमचे मित्र इतरांशी कशाप्रकारे संवाद साधतात त्याकडे लक्ष द्या. आपण जिथे राहतो ते हे जग आहे, हे समजून घ्या आणि हे स्वीकारण्यात काही गैर नाही. काहीही समजून घेण्याचा ट्रोल्सचा वेग कमी असतो आणि त्यांच्यासाठी नवीन असलेली कोणतीही गोष्टवर संशय घेतात.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बिश्नोई गँगने अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सध्या सलमान खानच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे.