Somy Ali Reacts on Aamir Khan third marriage : अभिनेता आमिर खान ६१ व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरं लग्न करतोय. उद्या, ५ जुलैला तो तिच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहे. त्याच्या मुंबईतील घरी लग्नाची तयारी सुरू आहे. आमिरच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्याच्या लग्नाला कुटुंबीय व मोजकेच मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नानिमित्त सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोमी अली हिने आमिर खान व गौरी स्प्रॅट यांच्यासाठी एक पोस्ट केली आहे. वय हे वर्षांमध्ये मोजलं जातं, पण प्रेम हे गोड क्षणांमध्ये मोजलं जातं, आनंदी राहण्यासाठी कोणतीही शेवटची तारीख नसते, असं सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय.
गौरी आणि आमिर,
प्रेम हे कोणत्याही कॅलेंडरनुसार चालत नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सोबती मिळणं, हे वयाच्या २० व्या वर्षी जोडीदार मिळण्याइतकंच सुंदर असतं. स्वतःसाठी आनंद निवडण्यास कधीही उशीर होत नसतो. प्रेमाचं स्वागत करणाऱ्या हृदयाचं नेहमी सेलिब्रेशन केलं पाहिजे, त्यावर टीका करू नये. वय हे वर्षांमध्ये मोजलं जातं, पण प्रेम हे गोड क्षणांमध्ये मोजलं जातं.
तुम्हा दोघांचं मनापासून अभिनंदन!
काही लोक योग्य व्यक्तीच्या शोधात संपूर्ण आयुष्य घालवतात. जर हा प्रवास कोणत्याही वयात लग्नापर्यंत पोहोचत असेल, तर त्याला उशीर झाला असं म्हणता येणार नाही. खरं तर तीच लग्नाची अगदी योग्य वेळ असते. आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्याचं धाडस हे इतरांना प्रेरणा देणारं असतं.
तुम्हा दोघांनाही आनंद, हास्य आणि कम्पॅनियनशिपने भरलेल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वोत्तम लव्ह स्टोरीची ओळख ती कधी सुरू झाली ही नसते, तर ती कहाणी तुम्ही किती मनापासून जगलात यावरून होते. तुमच्या वयावरून टीका करणाऱ्यांना एक दिवस नक्कीच समजेल की, आनंदी राहण्यासाठी कोणतीही शेवटची तारीख नसते. वयाने मोठे होणं अपरिहार्य आहे, पण सोबत जगणं ही एक मौल्यवान भेट आहे. आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट ही कमी वयात लग्न करणं नसून, ज्याच्यासोबत तुम्हाला म्हातारं व्हायला आवडेल अशी व्यक्ती शोधणं ही आहे, अशी पोस्ट सोमी अलीने केली आहे.
दरम्यान, आमिर खानच्या लग्नाला त्याच्या दोन्ही एक्स पत्नी रीना दत्ता व किरण राव उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या लग्नात एकूण १५० पाहुणे हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्या घरी लग्नाची सजावट सुरू आहे.
