Salim Khan Health : ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना १७ फेब्रुवारी, रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर मुलगा सलमान खानने वडिलांची भेट घेतली. तसंच सलमान खानची बहीण अलविरा खानदेखील रुग्णालयात पोहोचली. सलमान व्यतिरिक्त, सलीम खान यांचे जावई अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मादेखील रुग्णालयाबाहेर दिसले.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सलीम खान यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. “त्यांना सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे काही व्हिडीओसुद्धा पापाराझी अकाऊंटद्वारे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आता सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती
सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत लीलावतीचे डॉक्टर जलील पारकर यांनी माहिती देत म्हटलं, “बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आज सकाळी ८.३० वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावर डॉ. विनय चव्हाण (न्युरोलॉजिस्ट), डॉ. अजीत मेनन (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. नितीन डांगे (न्यूरोसर्जन) आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.”
“कुटुंबीयांच्या विनंतीनुसार अधिक तपशील शेअर केले जाणार नाहीयत. तर १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत, दरम्यान या काळात सर्वांनी संयम राखावा”, असं त्यांनी सांगितलं.
सलीम खान हे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध पटकथा लेखक आहेत. त्यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठीचं लेखन केले आहे. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासह अनेक चित्रपटांचं लेखन केलं. ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘शोले’, ‘मिस्टर इंडिया’, ‘हाथी मेरे साथी’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’सारख्या सिनेमांचं त्यांनी लेखन केलं आहे.
सलीम खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर त्यांचा जन्म इंदौरमध्ये झाला. सलीम खान यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांचं पहिलं लग्न सलमा खान यांच्याबरोबर झालं आहे. नंतर हेलेन यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं.
सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत कळताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे काळजी व्यक्त केली होती. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती देत प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.
