Salim Khan Hospitalized : बॉलीवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम खान हे प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे वडील आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सलीम खान यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. “त्यांना आज सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या आयसीयूमध्ये आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे काही व्हिडीओसुद्धा पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आले आहेत. Viral Bhayani या पापाराझी अकाऊंटद्वारे सलमान खानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, यात तो रुग्णालयात जाताना दिसत आहे. मुंबईतील वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये तो वडिल सलीम यांना भेटण्यासाठी गेला होता.

सलीम यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले याबाबतही अधिकृतपणे काही अपडेट देण्यात आलेली नाही. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर काळजी व्यक्त केली आहे.

सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी आहे. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. त्यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी ‘शोले’ हा चित्रपट आहे. याशिवाय, त्यांनी ‘दीवार’, ‘जंजीर’ तसंच ‘डॉन’यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची पटकथा लिहिली आहे.

सलीम खान यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी सलमा खान यांच्याबरोबर १८ नोव्हेंबर १९६४ ला लग्नगाठ बांधली. त्यांना पाच मुले आहेत. सलीम खान यांनी हेलन यांच्याबरोबर दुसरे लग्न केले. हेलनदेखील खान कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. अनेक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये हे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसते.

कुटुंबातील सदस्यांनी याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये हेलन यांच्याबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे सांगितलं आहे. तसंच सलमान खानने एका मुलाखतीत हेलन आणि सलमा या उत्तम आई असल्याचे सांगितलं होतं.

नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये सलीम खान यांचा ९० वा वाढदिवस साजरा झाला. याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबतचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.