Tere Naam Re-release Date : सलमान खानचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘तेरे नाम’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचे चाहते हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्याने उत्सुक आहेत. हा चित्रपट जेव्हा पहिल्यांदा थिएटरमध्ये रिलीज झाला होता, तेव्हा त्याची कथा, सलमान खानचा लूक व खासकरून हेअरस्टाइलने आणि भूमिका चावलाच्या निरागसतेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याचबरोबर या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती.
सलमान खान आणि भूमिका चावलाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. ‘तेरे नाम’ हा चित्रपट तमिळ अॅक्शन-ड्रामा ‘सेतू’ चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट एका खऱ्या घटनेपासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं.
सलमान खानचा गाजलेला चित्रपट ‘तेरे नाम’ १५ ऑगस्ट २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. ‘तेरे नाम’ ने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती. जवळपास २२ वर्षांपूर्वी तब्बल १० कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे १४ कोटींची कमाई केली होती, तर जगभरातील त्याचे कलेक्शन अंदाजे २२ कोटी रुपये होते. त्या वर्षी या चित्रपटाला तब्बल २४ नॉमिनेशन्स मिळाली होती. ‘तेरे नाम’ हा बॉलीवूडचा एक कल्ट क्लासिक मानला जातो.
चाहते बऱ्याच काळापासून ‘तेरे नाम’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी करत होते. अखेर चाहत्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ‘तेरे नाम’ २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जर तुम्हाला हा चित्रपट घरी बसून पाहायचा असेल तर तुम्ही तो पाहू शकता. ‘तेरे नाम’ हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.
‘तेरे नाम’ चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा राधे मोहन (सलमान खान) या तरुणाभोवती फिरते. तो कॉलेजचा माजी विद्यार्थी असतो, पण तरीही त्याचा कॉलेजमध्ये दरारा असतो. तो निर्जरा (भूमिका चावला) नावाच्या एका साध्या आणि सोज्वळ मुलीच्या प्रेमात पडतो. सुरुवातीला निर्जरा राधेच्या वागण्यामुळे त्याचा तिरस्कार करते, पण नंतर तिला त्याच्या प्रेमाची खात्री पटते. मात्र, जेव्हा ते एकत्र येतील असं वाटतं तेव्हा एका हल्ल्यात राधेच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि त्याची मानसिक स्थिती बिघडते. या दुर्दैवी प्रेमकथेचा शेवट अत्यंत हृदयद्रावक आहे.

