सलमान खानचं ब्रेसलेट हे अभिनेत्याइतकंच प्रसिद्ध झालं आहे. ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन असो, एखादा कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याची उपस्थिती असो, फिरोजा म्हणजेच टर्कॉईज (Turquoise) स्टोन असलेलं सिल्व्हर ब्रेसलेट त्याच्या हातात नेहमीच पाहायला मिळतं.

मात्र सलमानसाठी हे ब्रेसलेट केवळ फॅशनपुरतं मर्यादित नाही. या ब्रेसलेटचा त्याचे वडील सलीम खान यांच्याशी भावनिक संबंध आहे. तसेच या दगडामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असल्याचा सलमानचा विश्वास आहे. एका जुन्या मुलाखतीत सलमानने खुलासा केला होता की, तो लहान असताना त्याचे वडीलही अशाच प्रकारचं ब्रेसलेट घालायचे.लहानपणी सलमान अनेकदा वडील सलीम खान यांच्या ब्रेसलेटशी खेळायचा. सलमानने चित्रपटांत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला त्याच प्रकारचं ब्रेसलेट भेट दिलं. त्यानंतर हे ब्रेसलेट सलमानच्या लूकचा कायमचा भाग बनलं.

ब्रॅसलेटमधील विशिष्ट दगडाबद्दल सांगताना सलमान म्हणाला, “या दगडाला फिरोजा म्हणतात. असं म्हणतात की दोनच जिवंत दगड आहेत. एक आहे अकीक आणि दुसरा फिरोजा. हा टर्कॉईज म्हणजेच फिरोजा आहे.” सलमानने त्याच्या ब्रेसलेटशी संबंधित असलेल्या समजुतीबद्दलही सांगितलं आणि हा दगड आपल्यासाठी खास का आहे, हे स्पष्ट केलं.तो म्हणाला, “यामुळे असं होतं की तुमच्यावर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत असेल, तर हा दगड ती ऊर्जा स्वतःवर घेतो. त्यानंतर त्यावर शिरा दिसू लागतात आणि तो तडकतो.”
त्याच्याबरोबर असं किती वेळा घडलं आहे, हे सांगताना सलमान पुढे म्हणाला, “हा माझा सातवा दगड आहे.”

फिरोजा दगडामध्ये अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले तथ्य समजू नये. २०२३ मधील एका अहवालानुसार, फिरोजा दगड असलेल्या या चांदीच्या ब्रेसलेटची किंमत अंदाजे ८० हजार रुपये असल्याचं सांगितलं जातं. दगडाची गुणवत्ता आणि ब्रेसलेटवरील कारागिरीनुसार त्याची किंमत सुमारे १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. या ब्रेसलेटची किंमत कितीही असली तरी सलमानसाठी त्याची भावनिक किंमत त्याहून अधिक असल्याचं दिसतं, कारण या ब्रेसलेटचा त्याचे वडील सलीम खान यांच्याशी खास संबंध आहे. गेल्या अनेक वर्षांत चाहत्यांनी सलमानच्या असंख्य फोटो, सार्वजनिक कार्यक्रमांमधील उपस्थिती आणि टेलिव्हिजनवरील भागांमध्ये हे ब्रेसलेट पाहिलं आहे.

असंही सांगितलं जातं की, काही चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान भूमिकेला हे ब्रेसलेट शोभत नसल्यास सलमानने ते काढलं आहे. मात्र, अशा प्रसंगांचा अपवाद वगळता हे ब्रेसलेट त्याच्या लूकचा कायमचा भाग राहिलं आहे.वडिलांशी जोडलेल्या बालपणीच्या आठवणीपासून ते बॉलीवूडमधील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रिटी अ‍ॅक्सेसरीजपैकी एक होण्यापर्यंत, सलमानच्या फिरोजा ब्रेसलेटने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.