Salman Khan Aamir Khan Third Marriage : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केले असून तो गौरी स्प्रॅटसह लग्नबंधनामध्ये अडकला आहे. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गौरी व आमिर यांनी रविवारी, ५ जुलै रोजी लग्न केले. पाली हिल येथील घरी नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडले. नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये हे खास लग्न पार पडले. विशेष म्हणजे, आमिर व गौरीच्या या लग्नाला त्यांची मुलं उपस्थित होती. आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाची सिनेविश्वामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने आमिरच्या लग्नावर व रिलेशनशीपवर मिश्कील टिप्पणी केली होती.
सलमान खान कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने कौटुंबिक, वैयक्तिक गोष्टींवर गप्पा मारल्या होत्या. अनेक वर्षांपासून सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याच मुद्द्यावर कपिल शर्माने आमिर खानचे उदाहरण देत सलमानला खोचक प्रश्न विचारला होता. जवळपास एकाच वयाच्या असलेल्या सलमान व आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मोठा फरक आहे. आमिर खानने तीन लग्न केली असून तो अनेकदा आपल्या रिलेशनशीपबाबत उघडपणे बोलताना दिसून येतो; तर याउलट सलमान खानने अद्याप लग्न केलेले नाही. सलमानच्या रिलेशनशीपच्या चर्चा पूर्वी रंगत होत्या, मात्र त्याचे कोणतेच नाते लग्नापर्यंत टिकू शकले नाही; याबाबत कपिल शर्माने थेट सलमान खानला प्रश्न विचारला होता.
ते थांबत नाहीये आणि तुम्ही करत नाहीये – आमिर
कपिल शर्माने सलमान खानला आमिरचे उदाहरण देऊन लग्नाबद्दल विचारले होते. कपिल म्हणालेला, “नुकतीच आमिर खान यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून दिली आहे, तुम्ही तर त्यांच्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान आहात. ते तर थांबतच नाहीये आणि तुम्ही (लग्न) करतच नाहीये,” कपिलच्या या मिश्कील विनोदावर सर्वांनी हसून दाद दिली होती. त्याच्या या प्रश्नावर सलमाननेही खास शैलीमध्ये उत्तर दिले होते.
आमिर खानच्या लग्नावर सलमान खानचे मजेशीर वक्तव्य
लग्नाबाबत विचारताच सलमान खानने आमिरच्या रिलेशनवर मजेशीर वक्तव्य केले होते. सलमान म्हणालेला, “आमिर खानची गोष्टच काही निराळी आहे. आमिरचे व्यक्तिमत्त्व हे प्रभावशाली आहे. पूर्ण जगाला माहीत आहे की तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत त्याचे लग्न परफेक्ट होणार नाही, तोपर्यंत तो लग्न करत राहील आणि ती त्याची वैयक्तिक बाब आहे,” अशी मिश्कील टिप्पणी सलमान खानने केली होती. आता आमिर खानने तिसरे लग्न केले असून सलमान खानचे हे वक्तव्य चर्चेमध्ये आले आहे.
आमिर खान व गौरी स्प्रॅटचे लग्न
६१ वर्षीय आमिर खानने गौरी स्प्रॅटसह तिसऱ्यांदा लग्न केले आहे. गौरी स्प्रॅटचे हे दुसरे लग्न आहे. आमिर खानला रीना दत्तापासून जुनैद खान व आयरा खान अशी दोन मुले आहेत. आमिरची मुलगी आयरा हिचे लग्न मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्याशी झाले आहे. तसेच आमिर खान व किरण राव यांनाही आझाद नावाचा मुलगा आहे. त्याचबरोबर गौरी स्प्रॅटला तिच्या पहिल्या लग्नापासून ७ वर्षांचा मुलगा असून तो लग्नाच्या फोटो व व्हिडीओंमध्ये दिसून आला आहे.
