Salman Khan Ganpati Visarjan Aarti Video: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या कुटुंबाने पूर्ण उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. खान कुटुंबाने ढोल-ताशाच्या गजरात व वाजत-गाजत बाप्पाचे विसर्जन केले. सोशल मीडियावर खान कुटुंबाच्या या विसर्जनाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त लक्ष सलमान खानच्या आरतीच्या व्हिडीओने वेधले.
सलमान खान गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुढे येताच, पुजाऱ्यांनी त्याच्या हातात आरतीचे ताट दिले. त्यावर सलमान भक्तिभावाने गणरायाची आरती करू लागला; पण तो आरतीचे ताट उलट्या दिशेने फिरवत होता. उजवीकडून डावीकडे असे विरुद्ध दिशेने सलमान खानने गणपती बाप्पाची आरती करताच त्याची बहीण अर्पिता खानने त्याला अडवले.
सलमान खानने केली उलटी आरती
सलमान खान आरती करताना उलट्या दिशेने करत असल्याचे लक्षात येताच अर्पिताने भाईजानची चूक सुधारली. गर्दीतून सलमानला आवाज देत तिने आरती डावीकडून उजवीकडे फिरवण्याची खूण करून दाखवली. यावर सलमानच्या चूक लक्षात येताच, त्याने पुन्हा एकदा सरळ पद्धतीने गणरायाची आरती केली. पण यावेळी सलमानने दिलेली खास प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
मोठ्या भावाची चूक बहिणीने सुधारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलमान खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अर्पिताचे कौतुक केले. एका नेटकऱ्याने लिहिले, उगाच नाही, बहिणीला दुसरी आई म्हणत. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, सलमान खाननेसुद्धा तीच चूक केली, जी मी नेहमी चुकून करतो.
दीड दिवसाचा गणपती बाप्पा घरी विराजमान केल्यानंतर खान कुटुंबाने वाजत-गाजत गणरायाला निरोप दिला. खान कुटुंबाच्या विर्सजन मिरवणुकीमध्ये संपूर्ण खान कुटुंब उपस्थित असल्याचे दिसून आले. तसेच मित्र-मंडळीसुद्धा उत्साहाने सहभागी झाले होते. अर्पिताने तिच्या भावासह ठेका धरला. सलमान खानसुद्धा गणेशोत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी अरहान व निर्वाण खान यांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर सलमानची भाची आयतने त्याला गोड मिठी मारल्याचे दिसून आले. सलमानची जवळची मैत्रीण युलिया वंतूरही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. सलमाननंतर तिने गणपतीची आरती करीत बाप्पाचे दर्शन घेतले.
