स्क्रीनवर छान आणि तरुण दिसण्यासाठी अनेक सेलिब्रिटी विविध उपाय करत असतात. यापैकीच एक म्हणजे सलमान खान. सलमान खाननेसुद्धा वयानुसार केस कमी झाल्यानंतर हेअर ट्रीटमेंट केल्याचं निर्माता शैलेंद्र सिंहने सांगितलं आहे. मात्र यावेळी त्याने स्टार असण्याची किंमत चुकवावी लागते असं म्हटल्याचं शैलेंदने सांगितलं. यावेळी त्यांनी अभिनेत्याच्या घरी गेले असतानाचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला ज्यामुळे त्यांना धक्का बसला होता.

चित्रपट निर्माता शैलेंद्र सिंहने सलमान खानबरोबरच्या एका भेटीतील पडद्यामागचा एक किस्सा सांगितला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सलमान खान एका बाजूला बिर्याणी खात गप्पा मारत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावर हेअर ट्रीटमेंट सुरू होती. सायरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत शैलेंद्रने सांगितलं की, हा प्रसंग अनेक वर्षांपूर्वीचा असून तेव्हा ते दोघे दर सोमवारी रात्री सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी भेटायचे.

सलमानच्या अनोख्या सवयीचा खुलासा

शैलेंद्र सिंहने सांगितलं की, सलमान खानला आरशासमोर बसून जेवण्याची एक वेगळीच सवय होती. तो जेवत असतानाही आरशात स्वतःकडे पाहतो आणि समोर बसलेल्या व्यक्तीशीही आरशातूनच संवाद साधतो. शैलेंद्र म्हणाला, “मी एका मिटिंगसाठी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी गेलो होतो. त्या काळात आमच्या दर सोमवारी रात्री भेटी व्हायच्या. तो डायनिंग टेबलवर बसून जेवत होता आणि आरशात स्वतःकडे पाहत होता. त्याला आरशात पाहत जेवायला आवडतं. स्वयंपाकघरात एक छोटंसं टेबल आहे आणि त्यासमोर आरसा लावलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या शेजारी बसलेले असता, पण प्रत्यक्षात तुमचं बोलणं आरशातूनच सुरू असतं.”

शैलेंद्र सिंहने पुढे सांगितलं की, काही वेळातच एक व्यक्ती मेडिकल इक्विपमेंट घेऊन आत आला आणि त्यानंतरचं दृश्य त्याच्यासाठी आणखी विचित्र होतं. तो म्हणाला, “सलमान तिथे निवांत बसून बिर्याणी खात होता. सलमानला खाण्याची खूप आवड आहे, विशेषतः काही ड्रिंक्स घेतल्यानंतर. अचानक एक वेगळाच दिसणारा माणूस आत आला. त्याने हातात ग्लोव्हज घातले, सुई बाहेर काढली आणि सलमानच्या टाळूवर (स्काल्प) इंजेक्शन्स देऊ लागला. हे सगळं मी आरशातून पाहत होतो आणि मनात विचार करत होतो, नेमकं इथे काय चाललंय?” हे दृश्य पाहिल्यानंतर शैलेंद्रने सलमानला नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्याने अत्यंत सहजपणे उत्तर दिलं.

शैलेंद्रने विचारलेल्या प्रश्नाचं सलमानने अगदी सहजपणे उत्तर दिलं, “स्टार बनायचं असेल, तर त्याची किंमत मोजावीच लागते, भाऊ.” हे बोलतानाही तो निवांतपणे बिर्याणी खात राहिला आणि त्याचवेळी त्याच्यावर उपचारही सुरू होते. असं शैलेंद्रने सांगितलं. शैलेंद्र सिंहने सांगितलं की, नंतर त्याला समजलं की सलमान पीआरपी (Platelet-Rich Plasma) हेअर ट्रीटमेंट करून घेत होता. या उपचारामध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर करून केसांच्या वाढीस चालना दिली जाते. तो पुढे म्हणाला, “त्यावेळी मला हा उपचार नेमका काय आहे, हे माहिती नव्हतं. आता मात्र बहुतेक सगळेच हा उपचार करून घेतात. हृतिक रोशनही करतो, जवळपास प्रत्येकजण करतो. वय वाढू लागलं आणि केस कमी होऊ लागले की असे उपचार करावेच लागतात.”