Kubbra Sait on Salman Khan: सलमान खान बॉलीवूडमधील अशा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याच्याबरोबर अनेक कलाकारांना काम करण्याची इच्छा असते. अनेक सहकलाकार त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगतात. काही किस्सेही सांगतात. सलमान सेटवर खोड्या काढायचा, असेही अनेकांनी सांगितले आहे.
“आयुष्यातील प्रत्येक अनुभव…”
आता अभिनेत्री कुब्रा सैतने नुकतीच स्क्रीनशी संवाद साधला. यावेळी सुलतान सिनेमाबद्दल मनात काय भावना आहेत? असे विचारले. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मनात फक्त कृतज्ञतेची भावना आहे. ‘सुलतान’ हा माझ्या आयुष्यातील असा क्षण होता, जेव्हा मी स्वतःला पडद्यावर पाहिलं आणि समाधानाचा श्वास घेतला.”
यावेळी तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांचीही आठवण सांगितली. ती म्हणाली, “आपण ध्येयाच्या मागे इतके धावत असतो की, आतापर्यंत गाठलेल्या टप्प्यांचं कौतुक करायलाच विसरून जातो. अनेक वर्षे हातात मायक्रोफोन घेऊन कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणाऱ्या मुलीने देशातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एका चित्रपटात भूमिका साकारली. ‘सुलतान’ने मला शिकवलं की आयुष्यातील प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो. प्रत्येक अनुभव योग्य वेळी पुन्हा तुमच्या उपयोगी पडतो.”
कुब्राने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनीस बज्मी दिग्दर्शित ‘रेडी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटातही तिच्याबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत होता.
याबद्दल बोलताना कुब्रा म्हणाली, “माझा सलमानबरोबरचा प्रवास ‘रेडी’पासूनच सुरू झाला. करिअरच्या सुरुवातीला कोणती संधी कोणतं दार उघडेल, याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे प्रत्येक संधीचा आदर करत मी माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला.”
सलमान खानचे कौतुक करत ती पुढे म्हणाली, “सलमानबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तो खूप सहजतेने वावरतो. तुम्ही सुपरस्टार सलमान खानला भेटता, पण सेटवर तुम्हाला असा माणूस दिसतो, ज्याने अनेक दशकं लोकांना, कॅमेऱ्याला आणि सिनेमाला जवळून समजून घेतलं आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात इतकं सहज आणि आत्मविश्वासाने वावरण्याची त्याची कला पाहून त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.”
ती असेही म्हणाली, “सेटवरील वातावरण त्याच्यामुळे खूप निवांत असतं . त्याचा हा सहजस्वभाव मला खूप आवडतो. अनेकदा कलाकार म्हणून आपल्याला सतत अधिक काहीतरी करावं, अधिक दाखवावं आणि स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतं, असं वाटतं. पण सलमानची ही सहजता वेगळीच प्रेरणा देते’, असे म्हणत अभिनेत्रीने सलमानचे कौतुक केले.
