Bollywood Actress Troll For Attend Iftar Party : प्रत्येक वर्षी अनेक सेलिब्रिटी ईदच्या आधी होणाऱ्या इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होत असतात. यावर्षीही अनेक सेलिब्रिटींचे इफ्तार पार्टीतले फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत. अशाच एका इफ्तार पार्टीत सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटातील अभिनेत्री डेझी शाहसुद्धा गेली होती. या पार्टीतले तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
डेझी शाह सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच सोशल मीडियाद्वारे ती विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे आपले विचारसुद्धा मांडते. अशातच एका इफ्तार पार्टीत अभिनेत्री सहभागी झाली होती आणि यावेळी तिनं स्वत:च्या हातांनी मालपुआसुद्धा बनवला. यामुळे काहींनी तिची प्रशंसा केलीय, तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना तिनंही स्पष्ट उत्तर दिलं आहे.
फटाक्यांमुळे त्रास होतो, पण…
सोशल मीडियावर एका अकाऊंटद्वारे डेझीचा मालपुआ करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओसह असं म्हटलंय की, “ही आहे डेझी शाह. तिला फटाक्यांमुळे त्रास होतो. पण ही इफ्तार पार्टीत जाते आणि तिथे स्वत:च्या हातांनी मालपुआसुद्धा बनवते.” या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनीसुद्धा टीका केली आहे. हाच व्हिडीओ शेअर करत डेझीनं सर्व ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
धर्माच्या नावाखाली आपण द्वेष…
डेझीने म्हटलं, “फटाके फोडणे आणि स्वयंपाक (मालपुआ करणे) या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. धर्माच्या नावाखाली आपण जो द्वेष पसरवत आहात, त्यासाठी शुभेच्छा. आशा करते की, आपण यातून लवकर बरे व्हाल.” डेझीच्या या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा तिला पाठिंबा दिला आहे. “बरोबर आहे”, “योग्य उत्तर दिलंस”, “अशा काही अकाऊंटद्वारे फक्त नकारात्मक्ता पसरवली जाते”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Fire Crackers and cooking food are completely different from each other. Good luck with spreading hate in the name of religion. I hope you get well soon ? https://t.co/QNCN086CE4
— Daisy Shah (@ShahDaisy25) March 8, 2026
काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्रचारावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे इमारतीच्या एका घराला आग लागली होती. याबद्दल तिनं व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. ती म्हणालेली, “इमारतीसमोर प्रचार करणाऱ्यांनी फटाके फोडले. ज्यामुळे एका घराला आग लागली आहे. हे नैसर्गिक संकट नसून डोक्याचा भाग नसलेल्या लोकांमुळे उद्भवलेले संकट आहे” असं म्हटलं होतं. याच घटनेचा संदर्भ घेत आता तिला इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे.
दरम्यान, डेझीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं अनेक वर्षे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं आहे. नंतर २०११ साली आलेल्या कन्नड चित्रपट ‘भद्र’मधून ती अभिनयाच्या क्षेत्रात आली. पुढे सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात डेझी मुख्य भूमिकेत दिसली. यामुळे तिला भरपूर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. सध्या ती कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसत नसली, तरी ती वेबसीरिज आणि गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
