Salman Khan Talks About Shah Rukh Khan : सलमान खान व शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. दोघांनीही करण जोहरबरोबर काम केलं आहे. परंतु, शाहरुख खाननं सलमानच्या तुलनेत करणबरोबर अधिक काम केलं आहे आणि दोघेही एकमेकांचे जवळचे मित्रसुद्धा आहेत, त्यामुळे करण जोहर सलमान व शाहरुखमध्ये भेदभाव करतो असं स्वत: सलमान ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये म्हणाला होता.
सलमान खान त्याच्या मिश्कील स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. २०१७ मध्ये पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये त्यानं असंच करण जोहरची मस्करी केली होती. करण जोहर, सलमान खान व शाहरुख खान यांनी या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी शाहरुख खान व आपल्यामध्ये करण जोहर भेदभाव करतो असं सलमान खान म्हणाला होता. सलमान नेमकं काय म्हणालेला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार करण जोहर सूत्रसंचालन करताना म्हणालेला, “आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांमधील मैत्रीपूर्ण संबंधांबद्दलही बोलणार आहोत आणि जेव्हा मी मैत्रीबद्दल विचार करतो, तेव्हा माझ्या डोक्यात ज्याचं पहिलं नाव येतं त्याला तुम्ही सर्वच ओळखता; म्हणून अजिबात वेळ न दवडता मी तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख करून देऊ इच्छितो, ज्याच्या गालांवरील खळ्या आयफेल टॉवरपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहेत… जो माझ्यासाठी मैत्रीचं दुसरं नाव आहे आणि प्रत्येक तरुण मुलीसाठी प्रेमाचं पहिलं नाव. माझा मित्र, शाहरुख खान.”
करण जोहरनं स्टेजवर बोलावल्यानंतर शाहरुख खान न आल्यामुळे तो पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की त्याला माझं बोलणं ऐकू गेलं नाहीये. मी पुन्हा त्याला बोलावतो. सर्वांनी शाहरुख खानचं टाळ्या वाजवून स्वागत करा.” करण पुढे म्हणाला, “जो एरवी माझ्या एका कॉलवर येतो तो आता दोनदा बोलावल्यानंतही येत नाहीये. मला असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडत आहे, मी मागे जाऊन बघून येतो.”
सलमान खाननं केलेली करण जोहरची मस्करी
करण जोहर शाहरुख खानच्या नावाची पाटी असलेल्या रूममध्ये गेल्यानंतर त्याला तिथे सलमान खान उभा असल्याचं दिसतं. त्यावेळी तो सलमानला “तू इथे आहेस, हॅलो काय करतोयस तू?” असं म्हणतो; ज्यावर सलमान “स्वागत नाही करणार माझं” असं म्हणतो. सलमान खान पुढे करणचं कौतुक करत म्हणाला, “करण जोहर तू काय काय करतोस? दिग्दर्शनही करतो, निर्मितीही करतोस, सूत्रसंचालनही करतो आणि अभिनेता करण जोहर…” त्यावर करण “पुढे काहीच बोलला नाहीस तर बरं होईल” असं म्हणतो.
पुढे करण सलमानला म्हणालेला, “मी दोनवेळा शाहरुखचं नाव घेतलं, पण तो आला नाही. तो स्टार स्क्रीन अवॉर्ड्स सुरू करत आहे.” यावर सलमान, “हा काय भेदभाव आहे करण? तुझ्या पहिल्या चित्रपटात तू शाहरुख खानची निवड केली, कॉफी विथ करणच्या पहिल्या एपिसोडसाठी त्याला आमंत्रित केलं आणि इथेसुद्धा शाहरुख खानच आधी आहे; हे होऊ शकत नाही.”
सलमान पुढे म्हणालेला, “तुला माहीत आहे मी शब्दाचा किती पक्का आहे, म्हणून जेव्हा मी शब्द देतो त्यानंतर मग मी स्वत:चंही ऐकत नाही, त्यामुळे या शोचा शुभारंभ करण्यासाठी मी आधी जाणार, शाहरुख खान नाही; तू इथेच थांब, बस इथे मी जातो.”
