सलमान खान आणि करिश्मा कपूर सध्या त्यांनी ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावल्यामुळे चर्चेत आहेत. दोघेही अनेक वर्षांनंतर एका कार्यक्रमातून एकत्र झळकल्याने त्यांचे यातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. सलमान व करिश्मा यांनी यावेळी एकत्र काम करतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या. दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची, असंही त्यांनी म्हटलं. आता करिश्माने त्यांची पहिली भेट कुठे झाली होती, याबद्दल सांगितलं आहे.
‘अशी’ झालेली सलमान खान व करिश्माची भेट
सलमान खान करिश्माला आधीपासूनच खूप आवडायचा. त्यामुळे त्याला भेटल्यानंतर ती काहीशी घाबरली होती, असंही तिने सांगितलं आहे. करिश्मा सलमानबरोबरच्या भेटीचा किस्सा सांगत म्हणाली, “१९९० मध्ये मी १६ वर्षांची होते आणि सत्यम हॉलमध्ये सरोज खान यांच्याबरोबर डान्सची रिहर्सल करत होते. तेव्हा तिथे सलमान खान होता आणि त्याला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मग मी तिथून जात असताना सलमान तिथे बसलेला होता आणि त्याने जांभळ्या रंगाची पँट आणि शर्ट परिधान केला होता, जो नंतर ट्रेंड बनला. तेव्हा तो मला म्हणाला, तू डब्बू काकाची मुलगी आहेस ना? मी मनातल्या मनात सलमान खान माझ्याशी बोलत आहे म्हणून खूप उत्सुक झाले होते. त्यावेळी बाबा आणि सलीम काका खूप जवळचे मित्र होते.”
करिश्मा याबद्दल बोलताना पुढे म्हणाली, “त्यानंतर त्याने मला चॉकलेट दिलं.” कार्यक्रमात करिश्माने हा किस्सा सांगितल्यानंतर करणने चकित होऊन तिला चॉकलेट दिलं, असं विचारलं. त्यावर तिने हो असं म्हटलं. पुढे करण म्हणाला, “अनेकदा दोन लोक दीर्घकाळ एकत्र असले किंवा त्यांच्यात चांगले संबंध असले की इंडस्ट्रीत त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होते. पण मला असं वाटतं आणि मी अभिमानाने म्हणू शकतो की तुमची मैत्री मात्र या सगळ्यापलीकडे आहे.” त्यावर सलमानने गंमतीत ‘नाही’ असं म्हणत करिश्माची मस्करी केली. पुढे तो म्हणाला, “दीर्घकाळ चाललेलं लिव्ह-इन अफेअर. तिने मला सोडून लग्न केल्यानंतर मला खूप वाईट वाटलं होतं.” असं म्हटल्यावर करिश्माने चिडून त्याला त्याचे शब्द मागे घ्यायला लावले आणि “बघा, हा माझ्याबरोबर नेहमी असंच वागतो,” असं म्हणाली.
दरम्यान, सलमान व करिश्माने अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आणि बॉलीवूडमधील एकेकाळची लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी म्हणूनही हे दोघे ओळखले जाऊ लागले. आजही त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
