Being Salman Khan YouTube Channel : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला सलमान खान आता नव्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत भाईजानने नवीन सुरुवात करत असल्याचे जाहीर केले. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सध्या असलेला फॉलोवर्सचा आकडा पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
सलमान खान हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या तो हिंदी ‘बिग बॉस’ २० च्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. यामध्ये आता त्याने नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सुरुवातीपासून सुरू करूयात, असे हटके कॅप्शन लिहित त्याने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. यावेळी त्याने त्याचा मजेशीर व्हिडीओही शेअर केला आहे.
सलमान खानचे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल सुरू
सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो इंग्रजी अल्फाबेट बोलून दाखवत आहे. त्याने ए टू झेड (A to Z) गायले असून त्यासह लिहिले, “सुरुवातीपासून नवी सुरुवात करुयात, माझे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल सुरू करतोय. एपासून झेडपर्यंत सर्व काही येथे मिळून जाईल.” असे लिहित सलमानने त्याच्या चॅनेलची लिंक शेअर केली आहे.
बीइंग सलमान खान (Being Salman Khan) असे त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चॅनेलवर सध्या फक्त दोन हजार सबस्क्राइबर्सचा असून त्याचा सबस्क्राइबर्सचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. त्याने केवळ १० रील्स शेअर केले आहेत. यामध्ये सलमान खान मजेशीर अंदाजमध्ये दिसून आला असून तो दुहेरी भूमिका साकारताना दिसून येत आहे. पण, यूट्यूब चॅनेलवर तो नेमका कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर करणार आहे हे समोर आलेले नाही. सलमान खान आता व्लॉगर होणार का? याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सलमान खानचा लवकरच ‘मातृभूमी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
