Salman Khan Panvel Farmhouse Party: सलमान खानचे फार्महाऊस मुंबईपासून हे साधारण दोन तासांच्या अंतरावर रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आहे. सलमानने आपल्या लाडक्या बहिणीच्या (अर्पिता खान) नावावरून या फार्महाऊसला ‘अर्पिता फार्म्स’ असं नाव दिलं आहे. हे फार्महाऊस तब्बल १५० एकर परिसरात पसरलेले आहे. सलमानला निसर्गाची ओढ असल्याने तो तिथे सेंद्रिय शेती करतो. त्याच्याकडे अनेक घोडे आणि इतर पाळीव प्राणी देखील आहेत. सलमानला शूटिंग नसलं की तो फार्महाऊसवर वेळ घालवतो.

सलमानचे वाढदिवस आणि बॉलीवूडमधील मित्र-मैत्रिणींच्या पार्ट्या अनेकदा याच ठिकाणी होतात. सलमान त्याच्या फार्महाऊसवर कसा वेळ घालवतो, याबद्दल अभिनेत्री शहनाज गिलने सांगितलं होतं. तसेच फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सलमान खान निवांत असतो. शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, सलमान खानने सिनेमातील सर्व कलाकारांसाठी फार्महाऊसवर एक पार्टी आयोजित केली होती. शहनाज गिलदेखील या पार्टीत गेली होती. ती सलमान खानच्या फार्महाऊसवर दोन दिवस राहिली होती.

फार्महाऊसमध्ये दोन दिवस काय केलं?

शहनाज गिलने एका मुलाखतीत फार्महाऊसवर दोन दिवस कसे घालवले होते, त्याबद्दल माहिती दिली होती. “आम्ही सर्वांनी ‘किसी का भाई किसी की जान’च्या शुटिंगदरम्यान भाईजानच्या फार्महाऊसवर पार्टी केली होती. आम्ही दोन दिवस राहिलो आणि तिथे खूप मजा केली. आम्ही एटीव्ही चालवली. सलमान सर फक्त बेरी तोडत होते. सर खूप चांगले आहेत. ते शेती करतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे सगळी उत्तम व्यवस्था आहे.”

“फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सलमान खान कामाबद्दल, अ‍ॅक्शन सीन कसे करायचे याबद्दल आणि त्यांच्या आगामी चित्रपटात ते काय करत आहेत, याबद्दल बोलतात. त्यांना चित्रपटांबद्दल खूप ज्ञान आहे आणि तेच सर्वांबरोबर शेअर करतात,” असं शहनाज गिलने सांगितलं होतं.

सलमान खान जेव्हा पनवेलमधील आपल्या फार्महाऊसवर असतो, तेव्हा तो तिथल्या निसर्गरम्य वातावरणात रमतो. सलमानला शेतीची खूप आवड आहे. लॉकडाऊन दरम्यान त्याने तिथे ट्रॅक्टर चालवताना आणि भात लावणी करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. तो तिथे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतो. त्याच्या फार्महाऊसवर विविध फळांची झाडेही आहेत. तसेच सलमानच्या फार्महाऊसवर घोडे, अनेक पाळीव कुत्रे आणि इतर प्राणी आहेत. तो त्यांचा सांभाळ करण्यात वेळ घालवतो.