‘बिग बॉस २०’चा नुकताच झालेला ‘वीकेंड का वार’ एपिसोड चांगलाच चर्चेत राहिला. होस्ट सलमान खानने ट्रोलिंगपासून महिला कलाकारांना अस्वस्थ करणाऱ्या प्रकारांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. कलाकारांचे मागून फोटो काढून ते नेमके कोण आहेत, असा अंदाज त्यांच्या फॉलोअर्सना लावायला सांगणाऱ्या पापाराझींनाही सलमानने सुनावलं. अशा परिस्थितीचा सामना कलाकारांना करावा लागला तर त्यांनी त्याविरोधात आवाज उठवावा आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, असं आवाहनही सलमानने केलं.

या एपिसोडमध्ये सलमान म्हणाला, “मागून घेतलेला तो एक शॉट असतो, जो कोणत्याही अभिनेत्रीला आवडत नाही. काही अभिनेत्री असतील ज्या म्हणतील की ठीक आहे, मला काही फरक पडत नाही. पण ज्यांना हे आवडत नाही, त्यांचं काय?” सलमानने पुढे सई मांजरेकरचं उदाहरण देत सांगितलं की, “मी नुकतंच पाहिलं की सई मांजरेकर अशा प्रकारामुळे खूप अस्वस्थ झाली होती. नेहा धुपियानेही याविरोधात आवाज उठवला होता. माझी स्वतःची भाची रस्त्यावरून चालत होती आणि तिचेही मागून फोटो काढले जात होते. त्यावर कॅप्शन काय होतं? ओळखा पाहू कोण आहे. हे करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?”

सलमान खानने व्यक्त केला संताप

यानंतर सलमानने अशा प्रकारच्या फोटोंचा त्रास होणाऱ्या सर्व मुलींना याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला, “ज्या मुलींना हे आवडत नाही, त्यांनी अशा वेळी मागे वळून एक कानाखाली मारावी. तुमच्या आई-बहिणींचे असे फोटो काढा आणि आम्हाला दाखवा, असं त्यांना सांगा.” पुढे सलमानने अशा प्रकारे फोटो काढणाऱ्यांवर संताप व्यक्त करत त्यांना “विचित्र लोक” म्हटलं. “प्रत्येक कार्यक्रमात ते असंच करतात,” असंही तो म्हणाला.

सलमान खानने या प्रकारावर पुढेही संताप व्यक्त केला आणि अशा प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “ही कसली मानसिकता आहे? माझ्या ओळखीच्या ९० टक्के मुलींना आणि आता ज्या आई झाल्या आहेत, त्या कोणालाही पूर्वीही अशा प्रकारचे फोटो काढलेले आवडत नव्हते आणि आताही आवडत नाहीत. मला हे फोटो काढणारे लोक कोण आहेत, हे पाहायचं आहे. आणि मला ते कोण आहेत हे कळलं, तर मग…”