Ganesh Chaturthi : अभिनेता सलमान खान (salman khan) आणि त्याच्या घरचा गणपती नेहमी चर्चेचा विषय असतो. सलमानच्या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक, त्यात वाजणारे ढोल-ताशे, आणि त्या तालावर सलमानचं नृत्य खूप प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी सलमानच्या गणपतीला आणि त्याच्या विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावतात. यंदाही सलमानचे चाहते या क्षणाची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी, सलमान गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, आणि यात तो त्याच्या भाच्यांबरोबर आरती करतोय. मात्र, हे व्हिडीओ सलमानच्या घरच्या गणपतीचे नाहीत.

सलमान त्याची बहीण अर्पिता खानच्या घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी सलमान खानचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यात अरबाज खान, सोहेल खान, सलमानचे वडील सलीम खान दिसत आहेत. इथेच सलमानने बाप्पाच्या आरतीत सहभाग घेतला.

हेही वाचा…‘बिग बॉस’च्या सेटवर ज्येष्ठ चाहतीला भेटला सलमान खान; भाईजानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

सलमान अर्पिताच्या घरातील बाप्पाची आरती करत असून मागे ‘बाप्पा मोरया रे’ ही आरती सुरु आहे.सलमान अर्पिताची मुलगी आयतला घेऊन बाप्पाची आरती करताना दिसत आहे. मामा भाचीची जोडी बाप्पाची मनोभावे आरती करत असताना सलमान अर्पिताच्या मुलाला म्हणजेच अहिललासुद्धा आरती करण्यासाठी बोलवत असल्याचं दिसतंय. यात अहिल पुढे येऊन सलमान आणि तिथे उपस्थित इतर लहान मुलांबरोबर आरती करतो. अर्पिताची मुलगी आयत तिचे वडील आयुष शर्मा बरोबरही बाप्पाची आरती करताना दिसत आहे.

लुलिया, ऑरी आणि अनेक कलाकारांची उपस्थिती

अरबाज खानचा मुलगा अरहान खान, सोहेल खानची मुलं निर्वाण आणि योहान खान सुद्धा गणपती दर्शनासाठी आले होते.या व्हिडिओमध्ये अर्पिताच्या गणपतीच्या आरतीत अभिनेता वरुण शर्मा, लुलिया वंतूर, आणि अंबानींच्या लग्नापासून बॉलीवूडच्या प्रत्येक पार्टीत दिसणारा ऑरी सुद्धा सहभागी असल्याचं दिसतं.

हेही वाचा…शाहरुखनंतर अ‍ॅटलीच्या नव्या सिनेमात झळकणार सलमान खान आणि कमल हसन, ‘या’ महिन्यापासून चित्रीकरणाला होणार सुरुवात

दरम्यान, सलमानचा यावर्षी एकही सिनेमा प्रदर्शित होणार नाहीये. यावर्षी सलमान त्याच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर दिसणार नसला तरी तो छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनमध्ये झळकणार आहे. सध्या, तो त्याच्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, यात सलमानबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदना दिसणार आहे. हा सिनेमा २०२५ च्या ईदला प्रदर्शित होईल.