Salman Khan Movie Name Change : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची गेले काही दिवस चर्चा आहे. अशातच आता या चित्रपटाबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. मात्र, आता हे नाव बदलून ‘मातृभूमी में वॉर रेस्ट इन पीस’ (Maatrubhumi: May War Rest in Peace) असे करण्यात आले आहे. आज (१६ मार्च) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत सलमानने ही माहिती दिली.

जानेवारी महिन्यात सलमान खानने या चित्रपटातील ‘मातृभूमी’ हे देशभक्तिपर गाणे रिलीज केले होते. याच गाण्याच्या नावावरून चित्रपटाचे शीर्षक ठेवण्यात आले आहे. हे गाणे अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायले असून, गीत समीर अंजान यांनी लिहिले आहे, तर संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले आहे.

Award Banner

चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये सलमान खान रक्ताने माखलेल्या आणि जखमी अवस्थेत दिसत आहे. काट्यांच्या तारा गुंडाळलेला एक खांब तो स्वतःवर आदळण्यापासून रोखताना दिसत असून त्यावर ‘मातृभूमी’ हे नवीन नाव ठळकपणे दिसत आहे. या पोस्टरवरील आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देण्यात आलेली नाही.

याआधी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ही १० एप्रिल जाहीर करण्यात आली होती, मात्र या नवीन पोस्टरवर प्रदर्शनाची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही.

सलमानच्या चित्रपटाच्या या नवीन नावामुळे आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर सध्या या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमान पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांशी लढा देताना दिसला होता. मात्र, या टीझरवर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती. २०२० मधील भारत आणि चीन यांच्यातील गलवान संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाद निर्माण झाला. चीनमधील प्रसारमाध्यमांनी हा चित्रपट तथ्यावर आधारित नसल्याचे म्हटले होते, यामुळेच चित्रपटाचे नाव बदलले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, मातृभूमीबद्दल अधिक सांगायचं झाल्यास, ‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्वा लाखिया यांनी केले आहे. यात सलमानबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत आहे. भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्यागाची गाथा या चित्रपटातून मांडली जाणार आहे.