Salman Khan’s Teri Sexy Beauty Song of Maatrubhumi: सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे, तसेच तो बिग बॉसमधील सूत्रसंचालनामुळे अनेकदा चर्चेत असतो. मात्र, आता मात्र तो त्याच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आला आहे.

सलमान खानच्या ‘मातृभूमी’ या आगामी चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे हे गाणे सलमानने स्वत: गायले आहे. ११ वर्षांनंतर त्याने पार्श्वगायन केले आहे.

चित्रांगदा सिंहबरोबर पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन

सलमान खान फिल्म्स म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित झाले असून, नेटकरी त्यावर कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला सलमान स्टुडिओमध्ये येताना, हेडफोन लावताना आणि गाणे गाताना दिसतो; तर अभिनेत्री चित्रांगदा सिंह गिटार वाजवताना दिसते. तिचा लाल साडीमधील लूक लक्ष वेधून घेत आहे.

चित्रांगदा लाल रंगाच्या एअर होस्टेसच्या कपड्यांत दिसत आहेत. सलमान त्याच्या सहकारी सैनिकांबरोबर डान्स करताना दिसतो. सैनिक सुटीचा आनंद घेत असल्याचे गाण्यात पाहायला मिळते. सिनेमात चित्रांगदा सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रांगदा आणि सलमान खान पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत.

‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याबद्दल बोलायचे, तर साजिद खान यांनी या गाण्याचे लेखन केले असून, संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. सलमानने याआधी ‘हीरो’ चित्रपटातील ‘मैं हूं हीरो तेरा’ आणि ‘किक’ चित्रपटातील ‘हँगओव्हर’ ही लोकप्रिय गाणी गायली होती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’मधील गाण्यानंतर तब्बल ११ वर्षांनी त्याने पार्श्वगायन केले आहे.

‘मातृभूमी’मधील आतापर्यंत पाच गाणी प्रदर्शित

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी निर्मात्यांनी आतापर्यंत चित्रपटातील पाच गाणी प्रदर्शित केली आहेत.

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला ‘मातृभूमी’ हा चित्रपट भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. नंतर चित्रपटाचे नाव बदलून, ते ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ असे करण्यात आले आहे.

हा चित्रपट सुरुवातीला २०२६ मध्ये एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.