सलमान खान (Salman Khan)ने नुकतीच डंब बिर्यानी(Dumb Biryani) या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. हे यूट्यूब चॅनेल त्याचा पुतण्या अरहान खानचे आहे. अरहान त्याच्या मित्रांच्या मदतीने हे यूट्यूब चॅनेल चालवतो. देव रेयानी व अरुष वर्मा अशी त्यांची नावे आहेत. या संवादादरम्यान सलमान खानने अनेक बाबींवर त्याचे मत व्यक्त केले. प्रेरणादायी भाषणांबद्दल त्याला काय वाटते यावरही त्याने खुलासा केला आहे.

सलमान खान काय म्हणाला?

सलमान खानने म्हटले, “जर तुम्हाला खरंच काही शिकायचं असेल, तर तुम्ही भिंती, झाडे यांच्याकडूनही शिकू शकता. तुम्ही तुमच्या गुरूचे ऐकले पाहिजे; पण ते यूट्यूब किंवा गूगलसुद्धा असू शकतात. या सगळ्यात शिस्त महत्त्वाची असते. मी प्रेरणादायी भाषणांवर विश्वास ठेवत नाही. कोणालाच जिमला जायला किंवा काहीतरी शिकायला आवडत नाही. कारण- त्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे या स्वइच्छेने करण्याच्या गोष्टी आहेत.

पुढे त्याने म्हटले की, आम्ही जेव्हा एखादा खेळ खेळायचो. तेव्हा थकून जायचो. पण, त्यानंतर आमच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू असायचे. आम्हाला त्या गोष्टी पुन्हा कराव्याशा वाटत असत. आता आपण आपल्यातला तो उत्साह गमावला आहे. आपण आत्मसंतुष्ट होत चाललो आहोत. तो उत्साह कधीही मावळू देऊ नका. जर तुम्ही तुमच्यातला उत्साह गमावला, तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप आधीच वृद्धत्वाकडे जात आहात. हे कधीही झाले नाही पाहिजे. मी थकलोय, असं म्हणू नका. उठा आणि काहीतरी काम करा. मला झोप येत नाही, असे म्हणू नका. असे काहीतरी काम करा, ज्यामुळे तुमचे शरीर आपोआप थकेल आणि तुम्हाला झोप येईल.

सलमान खानने त्याच्या झोपेच्या सवयीविषयी बोलताना म्हटले, “मी साधारणपणे काही तास झोपतो. महिन्यातून एकदा मला ७-८ तास झोप मिळते. कधी कधी जेव्हा शूटिंगमध्ये ब्रेक असतो मला काही मिनिटांची झोप मिळते. माझ्याकडे जेव्हा काहीच करायला नसते, त्यावेळी मी झोपतो. मी जेव्हा तुरुंगात होतो, त्यावेळी मी खूप चांगली झोप घेतली. जेव्हा विमानात गोंधळ असतो तेव्हा मी झोपतो. कारण- अशा परिस्थितीत मी काहीही करू शकत नाही.”

“खूप कष्ट करा आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवाल, त्यावेळी ते मिळवून देण्यात ज्यांचा वाटा आहे, त्यांना श्रेय द्या. तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी घेऊ शकता. मात्र, यश फक्त तुमच्या एकट्याचे नसते. जर ते यश तुमच्या डोक्यात गेले, तर खात्रीने अनेक गोष्टी खराब होतील”, असे म्हणत सलमान खानने त्याचे मत व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,सलमान खान लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.