Salman Khan on Sanjay Dutt: सलमान खान व संजय दत्त यांची मैत्री कायमच लक्ष वेधून घेत असते. त्यांनी ‘साजन’ व ‘चल मेरे भाई’ या सिनेमांत एकत्र काम केले आहे. तसेच, ‘ये है जलवा’ या सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत होता. संजय दत्तने कॅमिओ केला होता, तर ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमात संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत होता, तर सलमान खानने कॅमिओ केला होता. ‘ओम शांती ओम’ या सिनेमातील ‘दिवानगी दिवानगी’ या गाण्यात संजय दत्त व सलमान खान दोघेही दिसले होते.

सलमान खान पोस्ट शेअर करत काय म्हणाला?

संजय दत्त व सलमान खान यांनी स्क्रीन तर शेअर केली आहेच, त्याचबरोबर त्यांच्यात उत्तम मैत्रीही आहे. सलमानने नुकतीच संजय दत्तसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. सलमानने लिहिले, “संजू बाबा आमच्या सगळ्यांचा बाबा आहे, तो त्याच्या मुलांचा बाबा आहे, मेरा बाबा, माझा भाऊ संजय दत्त.” शेवटी त्याने आय लव्ह यू असे लिहित प्रेम व्यक्त केले आहे. तसेच सलमानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे. सलमानच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे.

संजय दत्तची सुटका झाल्यानंतर सलमान खानने काय केले होते?

संजय दत्त व सलमान खान यांची मैत्री खूप जुनी आहे. अगदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधीपासून त्यांची ओळख होती. संजय दत्तला १९९३ मधील बॉम्बस्फोट खटल्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. सुरुवातीला जेव्हा संजय दत्तला अटक झाली होती, त्यावेळी अक्षय कुमार, अजय देवगण, सैफ अली खान, सलमान खान या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यांनी संजू आम्ही तुझ्याबरोबर आहोत, असे म्हणत संजय दत्तला पाठिंबा दिला होता.

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला शिक्षा सुनावली, त्यावेळी त्याला तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करायचे होते. ही गोष्ट जेव्हा सलमानला समजली, त्यावेळी तो संजयला त्याच्या घरी भेटायला गेलो. सलमान त्यावेळी नुकताच अमेरिकेहून परतला होता. जेव्हा २०१६ मध्ये संजय दत्तची सुटका झाली, त्यावेळी सलमान खानने त्याचे बॉडीगार्ड संजय दत्तसाठी पाठवले होते.

सलमान खानने BMW कार भेट म्हणून दिली आणि संजय दत्तने….

सलमानचा धाकटा भाऊ, सोहेल खानने २००० ला ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. संजयने या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली होती. संजयने या सिनेमासाठी मानधन घेतले नाही. मात्र, नंतर सलमानने संजयला एक नवीन बीएमडब्ल्यू कार भेट दिली, ज्याच्या चाव्या संजय दत्तने समुद्रात फेकून दिली. सलमानने ही गोष्ट ‘आप की अदालत’मध्ये सांगितली होती. अशा अनेक गोष्टींमुळे सलमान खान व संजय दत्त यांच्या मैत्रीची कायम चर्चा होते.