सलमान खानचे बॉलीवूडमधील बऱ्याच जणांशी वाद झाले. यापैकी एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी हेही होते. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ हा सुपरहिट चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर ते २०१९ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘इन्शाअल्लाह’ हा चित्रपट बनणार होता, ज्यामध्ये सलमान खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार होते. मात्र, या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वीच ते थांबलं. सलमान खानला चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करायचे होते, पण त्यासाठी भन्साळींनी नकार दिला. त्यामुळे सलमानने हा चित्रपट मध्येच सोडला आणि नंतर हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद करण्यात आला.

या दोघांमधील हा पहिलाच वाद नव्हता. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही असाच प्रकार घडला होता. त्या वेळीही सलमानला स्क्रिप्टमध्ये काही बदल हवे होते, पण भन्साळी त्यासाठी तयार झाले नाहीत. याच कारणांमुळे दोघांमधील मतभेदांच्या बातम्या अनेकदा समोर येत राहिल्या. असाच एक किस्सा ‘राम-लीला’ या चित्रपटाशीही संबंधित आहे. सलमान खानने संजय लीला भन्साळी यांना चित्रपटातील एक गाणं हटवण्यास भाग पाडलं होतं.

हा किस्सा २०१३ मध्ये आलेल्या ‘राम-लीला’ चित्रपटाच्या वेळचा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अनेक गाणी सुपरहिट ठरली, पण सलमान खानने एक गाणं हटवायला सांगितलं नसतं, तर या सुपरहिट गाण्यांच्या यादीत आणखी एका गाणं असतं.

राम लीला सिनेमातील गाण्याची गोष्ट

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने या चित्रपटातील ‘राम चाहे लीला’ या गाण्यात कॅमिओ केला होता. प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडलं होतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, चित्रपटात सुरुवातीला हे गाणं नव्हतंच. या गाण्याऐवजी दुसरं एक गाणं तयार करण्यात आलं होतं, जे नंतर सलमान खानच्या सांगण्यावरून चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगताना चित्रपटातून हटवलेल्या त्या गाण्याचा उल्लेख केला होता.

सरोज खान यांनी सांगितलेला किस्सा

२०१३ मध्ये ‘टॉकिंग सिनेमा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सरोज खान म्हणालेल्या “प्रियांका चोप्राला डोळ्यांसमोर ठेवून जे गाणं तयार केलं होतं, त्यात ‘थप्पड से डर नहीं लगता, लगता है प्यार से’ या ओळी होत्या. या ओळी सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘दबंग’ चित्रपटातील गाजलेल्या डायलॉगशी मिळत्या-जुळत्या होत्या. याच कारणांमुळे सलमान खानने या गाण्यावर आक्षेप घेतला होता.”

“‘राम-लीला’ चित्रपटातील प्रियांका चोप्राच्या गाण्याच्या कोरिओग्राफीवर मी सलग १० दिवस काम करत होते. गाण्याच्या बोलांमध्ये ‘दबंग’मधील तो प्रसिद्ध डायलॉग वापरण्यात आला होता, पण सलमान खानला हे अजिबात आवडलं नाही. यामुळे गाण्याची पूर्ण रिहर्सल थांबवण्यात आली आणि गाण्यात बदल करावा लागला,” असं सरोज खान यांनी सांगितलं होतं. तसेच गाण्यावर १० दिवस मेहनत आणि रिहर्सल करूनही आपल्याला त्याचं मानधन मिळालं नाही, असा दावा सरोज खान यांनी केला होता.

अशा प्रकारे ‘राम-लीला’ चित्रपटात प्रियांका चोप्रावर चित्रीत झालेल्या ‘राम चाहे लीला’ या गाण्याची एंट्री झाली. सरोज खान यांनी असाही दावा केला की, त्यांना दुसऱ्या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल, असं म्हटलं होतं. पण तसं झालं नाही. इतकंच नाही तर त्यांनी आधीच्या गाण्यासाठी बसवलेल्या स्टेप्सचाच वापर ‘राम चाहे लीला’ या गाण्यात करण्यात आला. त्यामध्ये प्रियांकाच्या ब्लाउजचा हुक बंद करण्याची आणि रुमाल झटकून कमरेला लावण्याची स्टेप होती.