सलमान खान आज बॉलीवूडमधील आघाडीच्या सुपरस्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो, मात्र त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.’आप की अदालत’मधील सलमानचा जुना व्हिडीओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने ‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशानंतरच्या कठीण काळाची आठवण सांगितली.
‘मैने प्यार किया’नंतर तब्बल सहा महिने त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं, असा खुलासा सलमानने केला. याच काळात त्याचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांनी एक अनोखी रणनीती सुचवली, ज्यामुळे त्याच्या करिअरला पुन्हा उभारी मिळण्यास मदत झाली, असंही सलमानने सांगितलं.
‘मैने प्यार किया’नंतर सलमान खानकडे काम नव्हतं
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने सलमान खानला अभिनेता म्हणून मोठी ओळख मिळवून दिली आणि त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. मात्र, या चित्रपटाच्या यशानंतर लगेचच सलमानकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली नव्हती. ‘आप की अदालत’मध्ये बोलताना सलमानने सांगितलं की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिने त्याला काम मिळालं नव्हतं. याच काळातील आणखी एक आठवण सांगताना सलमानने अभिनेत्री भाग्यश्रीने अभिनय सोडून लग्न करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचा त्याच्याकडे पाहण्याच्या इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम याबद्दलही भाष्य केलं.
भाग्यश्रीने लग्न केलं आणि चित्रपटाला मिळणारं सगळं श्रेय घेऊन गेली – सलमान खान
सलमान खान याबद्दल म्हणाला, “त्यानंतर चार ते सहा महिने मला कोणतंच काम मिळालं नाही. पुढे काम मिळेल की नाही, असंच वाटत होतं. कारण त्यावेळी भाग्यश्री मॅडमने निर्णय घेतला होता की, ती आता चित्रपटांमध्ये काम करणार नाही, मी लग्न करणार आहे”. सलमान खानने पुढे मिश्कीलपणे सांगितलं की, चित्रपटाच्या यशाचं बरंचसं श्रेय भाग्यश्री घेऊन गेली आणि त्यानंतर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. “तिने लग्न केलं आणि चित्रपटाला मिळणारं सगळं श्रेय घेऊन ती निघून गेली. इंडस्ट्रीतील लोकांना असं वाटायला लागलं की, खरं तर स्टार तीच होती, हा तर काहीच नव्हता” असंही तो म्हणाला.
सलीम खान यांनी मुलाला मदत करण्यासाठी ‘अशी’ आखली योजना
सलमानला चित्रपटांच्या ऑफर्स मिळण्यात अडचणी येत असल्याचं पाहून त्याचे वडील सलीम खान यांनी एक अनोखी योजना आखली. सलमानने सांगितलेलं की, त्याच्या वडिलांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेले दिग्दर्शक आणि निर्माते जी. पी. सिप्पी यांच्याशी संपर्क साधला आणि सलमानला एका चित्रपटासाठी साइन केल्याची घोषणा करण्याची विनंती केली.
सलमान म्हणाला, “माझ्या वडिलांनी निर्माते-दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांना फोन करून सांगितलं, मित्रा, माझ्या मुलाकडे सध्या कोणतंच काम नाहीये. त्याला कृपया एका चित्रपटासाठी साइन केल्याची घोषणा कर. कारण त्या दोघांनी एकत्र खूप काम केलं होतं, त्यामुळे सिप्पी साहेबांनी ही घोषणा केली”.सलमानने सांगितलं की, ही घोषणा एका ट्रेड मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाली आणि जी. पी. सिप्पी यांच्याबरोबर त्याचा आगामी चित्रपट असल्याची चर्चा सुरू झाली.
सलमानच्या म्हणण्यानुसार, ही बातमी समोर आल्यानंतर अनेक दिग्दर्शक आणि इंडस्ट्रीतील मंडळी त्याच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन येऊ लागले. काम मिळण्यासाठी संघर्ष करत असलेल्या काळात या युक्तीमुळे त्याच्या करिअरला पुन्हा एकदा वेग मिळण्यास मदत झाली.
