Salman Khan and Shah Rukh Khan Fight: सलमान खान व शाहरुख खान हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. शाहरुख खानला बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाते तर सलमान खान बॉलीवूडचा भाईजान आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे.

काही चित्रपटात सलमान खान शाहरुख खान ही जोडी एकत्र दिसली. करण अर्जुन, हम तुम्हारे हैं सनम, कुछ कुछ होता है हे त्यांचे चित्रपट गाजले. चित्रपटांबरोबरच त्यांच्या मैत्रीचादेखील चाहतावर्ग मोठा आहे. मात्र, एक काळ असा आला होता, ज्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता.

२००८ मध्ये त्यांच्या भांडणाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. त्यांच्यातील वादाचे काय कारण असू शकते, यावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले, पण खरे कारण समोर आले नाही. मात्र, स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात या कलाकारांनी यावर खुलासा केला होता.

Award Banner

“दोघांपैकी सर्वात जास्त…”

शाहरुख खान व सलमान खान स्क्रीन पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी शाहरुख खान प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला की, आमची अनेक गुपिते आहेत. आमच्या भांडण का झाले? हे सगळ्यात मोठे गुपित आहे. शाहरुख खान पुढे म्हणाला, “आमच्या भांडणाचे नेमके कारण काय होते, हे कोणालाच माहित नाही. मी तुम्हाला सांगतो. एका छोट्या गोष्टीवरुन आमच्यात भांडण झाले होते. दोघांपैकी सर्वात जास्त आनंदी कोण आहे? यावरुन आम्ही भांडलो होतो.”

शाहरुखच्या या खुलाशावर सहमती दर्शवत सलमान खान म्हणालेला, “हो, या कारणामुळे आमचे भांडण झाले होते.” शाहरुख म्हणाला, “त्या रात्री मी त्याला म्हणालो होतो, घरी गेल्यानंतर माझी पत्नी, माझी मुले माझी वाट पाहत असतात.” शाहरुखचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सलमान म्हणालेला, “मी लग्न करावे, म्हणून तो माझे मन वळवत होता.”

शाहरुख म्हणालेला, “मी त्याला सांगत होतो की घरी परतल्यावर पत्नी आणि मुलं आपली वाट पाहत असतात, ते किती सुंदर वाटतं. त्यामुळे आनंद होतो.” त्यावर सलमान म्हणालेला, “मी घरी जातो, तेव्हा मी जास्त आनंदी असतो, कारण माझ्या घरी माझी पत्नी नसते.”

शाहरुख पुढे म्हणालेला, “यामुळे आमचे भांडण वाढत गेले.” सलमान खान म्हणालेला, “आम्ही मारामारी केली नाही. अंदाज अपना अपनामध्ये कशी भांडणे आहेत, तसे आम्ही भांडलो होतो.”

“आमच्या भांडणानंतर लोकांनी आमच्यात….”

जेव्हा त्यांच्यात भांडण झाले, तेव्हा लोक त्यांच्यात फूट पाडण्याचा, एकमेकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत होते, असाही खुलासा शाहरुख खानने केला. तो म्हणाला, “आमच्या भांडणानंतर लोकांनी आमच्यात आणखी गैरसमज निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले. आम्ही दोघांनीही अशा गोष्टींना महत्त्व दिलं नाही. आम्हाला विश्वास होता त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही.” यावर सलमान म्हणाला, “मी अशा लोकांना गप्प बसवलं. मी ऐकलं आहे की शाहरुखनेही तसंच केलं.”

शाहरुख शेवटी म्हणाला, “मला आशा आहे की आमच्यातील ही मैत्री अशीच टिकून राहावी. ही फक्त मैत्री नाही, तर भावांप्रमाणे आमच्यात प्रेम आहे.”

लवकरच चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा पार पडणार आहे. ५ एप्रिल २०२६ ला हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकार, प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.